वाळूज महानगर : लॉकडाऊनच्या एक दिवस अगोदर मंगळवारी (दि.३०) बजाजनगरातील बड्या व्यापाऱ्यांकडे खरेदीसाठी छोट्या व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती. बजाजनगरात विविध प्रकारच्या होलसेल विक्रेत्यांकडे मंगळवारी परिसरातील छोट्या विक्रेत्यांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे शक्य नसल्यामुळे छोट्या विक्रेत्यांनी किराणासह विविध जीवनावश्यक वस्तूंची खरेदी बड्या होलसेल व्यापाऱ्यांकडून खरेदी करून निघून गेले.
---------------------
उन्हापासून संरक्षणासाठी पोलिसांना उपरणे
वाळूज महानगर : उन्हाचा कडाका वाढला असून, लॉकडाऊनही जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उन्हापासून संरक्षण व्हावे, यासाठी पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी वाळूज पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना उपरणे वाटप केले.
-----------------------
नारायणपुरात हाणामारी करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा
वाळूज महानगर : नारायणपुरात उधारीच्या पैशावरून एकास हाणामारी करणाऱ्या चौघांविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सत्तार बाबा शेख (४३, रा.नारायणपूर) यांनी रविवारी उधारीचे पैसे मागितल्यावरून गावातील सद्दाम शेख, बिलाल शेख, शाकीर शेख व शौकत शेख यांच्यासोबत वाद झाला होता. या किरकोळ कारणावरून चौघांनी सत्तार शेख यांना शिवीगाळ करून बेदम मारहाण केली.
---------------------------------
वाळूज महानगरात धूलिवंदन साधेपणाने
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात सोमवारी (दि.२९) धूलिवंदन साधेपणाने साजरे करण्यात आले. कोरोनाच्या संसर्गामुळे पोलीस प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी रंगोत्सव साजरा करण्यास मनाई केली होती. नागरिकांनी घरच्या घरी एकमेकांना कोरडा रंग लावून साधेपणाने धुळवड साजरी केली.
-------------------