औरंगाबाद : जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बुधवारपासून (दि. २७) दररोज सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत उघडी राहतील, असे तोंडी निवेदन मनपा प्रशासकांतर्फे मंगळवारी खंडपीठात करण्यात आले. याचिकेचा उद्देश सफल झाल्यामुळे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीकांत कुलकर्णी यांनी मंगळवारी, दि. २६ मे रोजी याचिका निकाली काढली.
१५ मेच्या मध्यरात्रीपासून जीवनावश्यक वस्तूंची विक्री व खरेदीवर २० मेपर्यंत पूर्णपणे बंदी घालणाऱ्या विभागीय आयुक्तांच्या तोंडी सूचनावजा आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणी वेळी अॅड. संतोष चपळगावकर यांनी वरीलप्रमाणे निवेदन केले. तसा आदेश मनपा आयुक्त मंगळवारी जारी करीत आहेत. वरील ७ तासांपैकी सकाळी दुकाने उघडल्यानंतर अर्धा तास आणि दुपारी दुकान बंद करण्या पूर्वी अर्धा तास, असा एकूण एक तास दुकानाची साफसफाई आणि सामानाची व्यवस्था लावता येईल. नागरिक आणि दुकानदारांना सोयीच्या वेळेत सूट देण्याची अपेक्षा खंडपीठाने शुक्रवारी (दि.२३) व्यक्त केली होती.
सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत सूट का देत नाही? ज्यामुळे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळेल आणि गर्दी होणार नाही, अशी विचारणा खंडपीठाने केली होती, तसेच वेळ वाढवून देण्याची विनंती याचिकाकर्त्यानेही केली होती. त्यावरून मनपा प्रशासकांनी मंगळवारी वरीलप्रमाणे निवेदन केले. लोकांच्या आणि दुकानदारांच्या सोयीसाठी न्यायमूर्तीद्वय काही मार्गदर्शक सूचना करणार आहेत. त्यासह सविस्तर आदेश बुधवारी (दि. २७) दिला जाईल, असे खंडपीठाने सूचित केले.
लॉकडाऊनचे सर्व नियम लागू राहणारमहापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी मंगळवारी दुपारी अध्यादेश काढून किराणा दुकान आणि भाजीपाला खरेदी- विक्रीला दुपारी २ वाजेपर्यंत मुभा दिली. ३१ मेपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. आदेशात म्हटले आहे की, सकाळी ७ ते ७.३० आणि दुपारी १.३० ते २ हा वेळ दुकाने, हातगाड्या उघडणे व बंद करण्यासाठी राखीव आहे. सुरक्षित अंतर राखणे, नियमित मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. यावेळी गर्दी होणार नाही, परिसर वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे.