औरंगाबाद : संचारबंदी बुधवारी रात्री ८ वाजेपासून लागणार मग पुढील ३० तारखेपर्यंत दुकाने बंद राहणार . यामुळे बुधवारी दुकाने उघडण्यास परवानगी आहे की, नाही याबद्दल जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्टीकरण न आल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.
बुधवारी सकाळी बाजारपेठेतील बहुतांश दुकाने उघडली होती. मात्र, जसे पोलीस फाटा रस्त्यावर उतरला तसे पटापट दुकानाचे शटर खाली झाले पण पोलीस जाताच पुन्हा शटर वरती होऊन व्यवसाय सुरू केला जात होता. असे अनेकदा घडले.
संभ्रमावस्थेमुळे काही भागात दुकाना सुरू होत्या काही भागात बंद असल्याचे दिसून आले. पैठणगेट रस्त्यावर दुपारी हातगाडीवर कपडे विक्री सुरू झाली होती, काही कपड्याच्या दुकानाचे शटर अर्धवट वरती करण्यात आले होते. येथे पोलीस येताच दुकाने बंद झाली, हातगाड्यावाल्यांनाही हाकलण्यात आले. शहागंजमध्ये कपडे खरेदीसाठी हातगाड्यांवर महिलांची गर्दी दिसून आली.
पेट्रोल पंपावरही गर्दी दिसून आली. सिडको, हडको, जवाहर कॉलनी, जालनारोड, गारखेडा परिसर, शिवाजीनगर या भागातील अनेक दुकानाचे शटर अर्धवट उघडे होते, काही दुकानाचे शटर खाली होते पण ग्राहक आला की, त्यास शटर वर करून दुकानात पाठवले जात व पुन्हा शटर वरती केले जात होते. सरकारी आदेशात स्पष्टता नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
चौकट
शुक्रवारच्या बैठकीत व्यापाऱ्यांची ठरणार भूमिका
महाराष्ट्र चेंबरची ऑनलाईन बैठक बुधवारी पार पडली. सरकारने संपूर्ण लॉकडाऊन न केल्याबद्दल सर्व जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारच्या संचारबंदी निर्णय विरोधात पुण्यातील व्यापारी संघटनेने न्यायालयात धाव घेण्याची तयारी दर्शवली आहे. शुक्रवारी महाराष्ट्र चेंबरची बैठक होणार असून त्यात पुढील भूमिका जाहीर करण्यात येणार आहे, असे जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले.