वाळूज महानगर : पंढरपूरातील शासकीय जमिनीवर झालेले अतिक्रमण एक महिन्याच्या आत निष्कासित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर व्यावसायिक व ग्रामस्थांनी शुक्रवारी बैठक होऊन त्यात शनिवारी पंढरपूर बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार करण्यात आला.
पंढरपूरमध्ये शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून नागरिक वास्तव्य करीत आहेत. या जमिनीवर झालेल्या अतिक्रमणासंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. सदरील अतिक्रमण एका महिन्याच्या आत निष्कासित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला न्यायालयाने बजावले आहेत. या अनुषंगाने गुरुवारी महसूल विभागाच्या पथकाने पंढरपूरला भेट देवून अतिक्रमणाचा आढावा घेतला. त्यामुळे पंढरपुरातील व्यावसायिक व ग्रामस्थांनी शुक्रवारी विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात बैठक घेतली. बैठकीत उदय देशमुख, गौतम चोपडा यांनी वस्तूस्थिती न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी नागरिकांनी खरेदीखताची कागदपत्र सादर करण्याचे आवाहन केले.
तसेच या संदर्भात न्यायालयीन लढा देण्यासाठी कृति समिती स्थापन करण्यात आली. चर्चेअंती या निर्णया विरोधात न्यायालयीन लढा देण्याचा व शनिवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शनिवारी पुन्हा वकिलांच्या उपस्थितीत या संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीला मयुर चोरडिया, अनिल पारसवाणी, मधुसुदन आग्रवाल, संजय लोढा, विष्णु राऊत, मुकेश ठाकूर, गणेश मातकर, रहिम पठाण, जावेद शेख, संतोष चोरडिया आदींसह व्यवसायिक व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.