कोरोनाच्या संसर्गाला ब्रेक करण्यासाठी रॅपिड ॲन्टिजन चाचणीवर भर देण्यात येत आहे. मात्र, मुबलक प्रमाणात त्या उपलब्ध नसल्याने आरोग्य विभागाला हात आखडता घ्यावा लागत आहे.
सोयगाव तालुक्यातील ॲन्टिजन किट कमी असल्याने संपर्क शोध मोहिमेतील रुग्णांच्या चाचण्या घेताना अडचणी येत आहे. जरंडी आणि निंबायती कोविड केंद्रासह आरोग्य उपकेंद्रात चाचण्या बंद कराव्या लागल्या असल्याची चित्र आहे. या प्रकारामुळे संबंधित भागात कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून अपेक्षित प्रमाणात ॲन्टिजन किटचा पुरवठा होत नसल्याने आरोग्य विभाग बुचकळ्यात सापडला असून, वाढत्या संसर्गावर प्रतिबंध घालण्यासाठी अडचणी येत आहेत.
------- आरोग्य विभागाकडून दुर्लक्ष -----
सोयगाव तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून येत असताना जिल्हा आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. एकीकडे कोविड लसींचा साठाही संपला असताना दुसरीकडे आता ॲन्टिजन किटचा तुटवडा निर्माण झाल्याने सोयगावला जिल्हा प्रशासन वाऱ्यावर सोडत असल्याचे चित्र आहे. लसींचा साठाही नाही आणि किटचा पुरवठा होत नसल्याने सोयगाव तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.