लोकमत न्यूज नेटवर्कजालना : महापुरुषांच्या विचारांची आणि कार्याची प्रेरणा नागरिकांना मिळावी या उद्देशाने शहरातील मुख्य चौकांत त्यांचे पुतळे बसविण्यात आले. तीन वर्षांपूर्वी पालिकेच्या विशेष निधीतून त्यांचे सुशोभीकरणही करण्यात आले. मात्र, तेही अल्पजीवी ठरल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे खाजगी संस्था वा कंपन्यांनी स्वनिधीतून केलेले काही चौकांचे सुशोभीकरण आजही सुस्थितीत आहे, हे विशेष! जालना नगरपालिकेतर्फे जवळपास तीन वर्षांपूर्वी विशेष निधीतून वेगवेगळ्या चौकांच्या सुशोभीकरणाचे काम मोठा गाजावाजा करून हाती घेण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात सर्व बाजुनी मार्बल फर्शी बसविण्यात आली. पुतळ्याच्या चारही बाजूंनी कारंजे लावून हॉयमास्ट दिवे लावण्यात आले. सुशोभीकरणाच्या या कामावर तब्बल वीस लाखांचा निधी खर्च झाला. लोकप्रतिनिधी व मान्यवरांच्या उपस्थितीत या कामांचे थाटात उद्घाटनही झाले. त्यानंतर मात्र या कामाच्या देखभाल दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले. सद्यस्थितीत मार्बल फर्शी फुटली आहे, तर काही भागातील फर्शी चक्क चोरुन नेण्यात आली. तीन वर्षांत केवळ चार ते पाच वेळा चालू करण्यात आलेले कारंजे सध्या बंदावस्थेत आहेत. कारंजाच्या गोलाकार हौदातील पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यातील विद्युत मोटारी नादुरुस्त होण्याच्या मार्गावर आहे. हायमास्ट दिवेही अधूनमधून बंदच असतात. शहराचा मध्यवर्ती भागात असलेल्या जनार्धन मामा नागापूरकर चौकाची अवस्था पुन्हा जैसे थे झाली आहे. सुशोभीकरण करताना चोहोबाजूंनी बसविलेले स्टीलरॉडही गायब आहेत. तर मार्बल फर्शी काढून नेण्यात आली आहे. शहरातील अन्य महापुरुषांच्या पुतळा परिसिरातील स्थिती यापेक्षा वेगळी नाही. कॉलेज रोडवरील राणी लक्ष्मीबाई पुतळ्याचे सुरक्षाद्वारच गायब असून, साफसफाई अभावी आतील बाजूस कचरा साचला आहे. रंगरंगोटी नसल्याने पुतळ्याची दुरावस्था झाली आहे. मंमादेवी मंदिरास लागून असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्याच्या सुरक्षा भितींचे गेट गायब आहे. तर बाजूलाच असलेल्या संविधान स्तंभाचीदेखभाल दुरुस्तीअभावी दुरावस्था झाली आहे. रेल्वेस्थानक चौकातील स्वामी विवेकानंद पुतळा परिसर तर समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. पुतळ्याच्या सर्वच बाजूंनी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. संरक्षणद्वार गायब झाल्यामुळे त्या ठिकाणी तार लावण्यात आली आहे. नियमित साफसफाई व देखभाल दुरुस्ती अभावी स्वामी विवेकानंद पुतळा परिसराची चकमच हरवली आहे. माळीपुऱ्यातील अण्णा भाऊ साठे पुतळ्याचे सुरक्षा गेट तुटले आहे. छत्रपती संभाजी महाराज चौकातील हायमास्ट दिवे बंद आहेत. पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरातील अन्य महापुरुषांचे पुतळे व चौकांचा परिसर समस्यांच्या गर्तेत आहे. शहरातील सामाजिक संस्थानी काही चौकांचे सुशोभीकरण केले आहे. या कामांची स्थिती चांगली असल्याचे आढळून आले.
शहरातील चौकांचे सुशोभीकरण ठरतेय अल्पजीवी!
By admin | Published: May 29, 2017 12:32 AM