मुक्काम वाढला, बाहेरच्यांना बेड मिळेना !
योगेश पायघन
औरंगाबाद : जिल्ह्यात केवळ ऑक्सिजन आणि इंजेक्शनचाच पुरवठा प्रभावित झालेला नाही. तर इतरही औषधांचा मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा होत असल्याने रुग्णांचा रुग्णालयातील मुक्काम वाढतोय. परिणामी बेड्सची कमतरता जाणवत आहे. खासगी रुग्णालयांसमोरही मोठा पेच निर्माण झाला असून आतील रुग्ण बाहेर येईना आणि बाहेरील गंभीर रुग्णांना बेड मिळेना, अशी अवस्था आहे. या प्रकारामुळे रुग्णाच्या नातेवाइकांची घालमेलही वाढल्याची स्थिती आहे.
दररोज जिल्ह्यात दीड हजारावर रुग्णांची भर पडत आहे. तर पंधरा हजार रुग्णांवर उपचार सुरू आहे. त्यांच्या उपचारात लागणाऱ्या औषधी व सर्जिकल साहित्याचीही मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्या तुलनेत साहित्य उपलब्ध होत नसल्याने रुग्णालयांची औषधी उपलब्ध करण्यात चांगलीच दमछाक होत आहे. त्यात गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांचा खाटांसाठी शोध सुरू आहे. तर रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना औषधी वेळेवर उपलब्ध होत नसल्याने त्यांचा मुक्काम वाढत असल्याने खाटा रिक्त होत नसल्याचे खासगी रुग्णालयाच्या डाॅक्टरांनी सांगितले.
---
एकूण रुग्ण -१,१४,४९५
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण -१५,०२२
---
पुरवठाच नाही
फेव्हीपिरॅव्हीर गोळ्यांची दररोज १५०० वर मागणी आहे. तर त्याचा साठा १५ हजारांहून अधिक आहे. या गोळ्या मिळण्याला अडचण नाही. तर रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी अधिक आहे. दररोज २हजार इंजेक्शनची मागणी आहे. पुरवठा त्या तुलनेत कमी होत आहे. शुक्रवारी केवळ ३०० इंजेक्शन उपलब्ध झाले. तर टॉसिलीझूमॅपचे व्हायल गेल्या पंधरा दिवसांपासून एकही मिळालेले नाही. त्याची आवश्यकता आहे. दररोज ५० हून अधिक व्हायलची मागणी आहे. असे औषधनिरीक्षण राजगोपाल बजाज म्हणाले.
--
औषधी (प्रति दिवस) मागणी पुरवठा
फेव्हीपिरॅव्हीर -१५००-१५०००
रेमडेसिविर व्हायल-२०००-३०० ते १२००
टॉसिलीझूमॅब व्हायल -५० -००
----
नातेवाइकांची घालमेल...
एक दिवसाचा मुक्काम वाढला
गेल्या आठ दिवसांपासून भावावर उपचार सुरू आहे. मात्र, रेमडेसिविर इंजेक्शन न मिळाल्याने एक दिवसाचा मुक्काम वाढला. आज इंजेक्शन मिळाले तर डोस पूर्ण होईल. आता रुग्णालयाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, पहिले इंजेक्शन मिळवायला खूप धावाधाव करावी लागली.
-समाधान तांगडे, नातेवाईक
रेमडेसिविरचा शोध चालू आहे
आधी मित्राचे वडील वारले. आता मित्र कोरोनाबाधित असून तो गंभीर आहे. त्याला कोणत्याही परिस्थितीत वाचवायचे आहे. त्याच्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शनची शोधाशोध करतोय. रुग्णालय आता प्रयत्न करायला लागले. मात्र, कोणत्याही परिस्थितीत ते मिळवण्यासाठी सर्व प्रमुख शहरांत, ओळखीच्या ठिकाणी शोधाशोध केली.
-योगेश मानकर, नातेवाईक
बेडची कमतरता
वडिलांचा सात दिवसांचे उपचार सिल्लोडमध्ये झाले. आता ऑक्सिजनची पातळी कमी जास्त होतेय. डाॅक्टर कोणत्याही क्षणी औरंगाबादला हलवायला सांगतील त्यामुळे बेडची शोधाशोध करतोय. व्हेंटिलेटरचा बेड मिळेल का शोधतोय. मात्र, कुठेही बेड मिळत नसल्याने घालमेल होतेय. वडिलांना धीर देतोय.
- गजानन ताडे, नातेवाईक
---
आईचे घाटीत उपचार सुरू आहे. मात्र, इथे औषधी बाहेरुन आणण्यास सांगितले जात नसल्याने काही अडचण नाही. युरिन बॅगसह किरकोळ साहित्य बाहेरुन आणण्यास सांगितले गेले, परंतु ते सहज उपलब्ध झाले. फक्त काही चाचण्या बाहेरुन कराव्या लागतात. इतर औषधींची चिंता नाही. पण आई लवकर कधी स्थिर होते. त्याची चिंता वाटते.
-कांता सूर्यवंशी, नातेवाईक
इंजेक्शन वेळेवर उपलब्ध होत नाहीत
संदर्भीत रुग्ण ग्रामीणमधून आधिच अतिगंभीर होऊन येत आहेत. त्यातच रेमडेसिविर आणि टॉसिलीझूमॅप हे कोरोना उपचारातील महत्त्वाची इंजेक्शन वेळेवर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे रुग्णालयातील मुक्काम वाढतोय. मात्र, लक्षणे दिसताच उपचार सुरू केलेले रुग्ण गंभीर होत नाहीत. त्यामुळे लवकर निदान लवकर उपचारावर भर द्यायला पाहिजे.
डाॅ. उज्ज्वला दहिफळे, रुग्णालय संचालक