छत्रपती संभाजीनगर : जि. प.च्या उर्दू, मराठी माध्यमांच्या प्राथमिक शाळांमध्ये तब्बल १ हजार ३६४ प्राथमिक शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असतानाही कार्यरत शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा वाढत आहे. त्यामुळे आगामी शिक्षक भरतीमध्ये संपूर्ण रिक्त जागा भरल्या पाहिजेत, अशी मागणी पात्रताधारक बेरोजगार युवकांच्या संघटनेने केली.
शासनाने शिक्षक भरतीची घोषणा केली आहे. त्यासाठीच काही दिवसांपूर्वीच पवित्र पोर्टलवर नोंदणी केली. मात्र, त्यानंतर पुन्हा प्रक्रिया थंडावली. राज्यभरातील जिल्हा परिषदांसह खासगी व्यवस्थापनांच्या अनुदानित शाळांची संचमान्यता पूर्ण केल्यानंतर रिक्त पदांचा तपशील समोर आला. जिल्ह्यात संचमान्यतेनंतर जि. प. शाळांमधील रिक्त पदांच्या आकडेवारीनुसार, विभागीय आयुक्त कार्यालयातील मागासवर्ग कक्षाकडून बिंदुनामावली तपासून घेतली. त्यामध्ये उर्दू माध्यमाच्या जि.प. शाळांमध्ये १५८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यात अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या २९, विजाअ ८, भजब ८, भजक १९, भजड १०, विमाप्र ११, इमाव ५९, आर्थिक दुर्बल घटक १४ पदे आहेत. खुल्या प्रवर्गासाठी एकही पद रिक्त नाही. त्याचवेळी मराठी माध्यमाच्या जि.प. शाळांमध्ये १२०६ जागा रिक्त आहेत. त्यात अनुसूचित जाती २४२, अनुसूचित जमाती २०८, विजाअ १, भजब १०, विमाप्र १४, इमाव २१७, आर्थिक दुर्बल घटक १२१ आणि खुल्या प्रवर्गाच्या २९३ जागा उपलब्ध आहेत. बिंदुनामावली तपासून घेतल्यामुळे रिक्त जागा भरण्याविषयी कोणतीही आडकाठी राहिलेली नाही. आता केवळ पवित्र पोटलवरून प्रक्रिया सुरू केल्यास तत्काळ भरती हाेईल, असेही पात्रताधारक बेरोजगार युवकांच्या संघटनेने सांगितले.
पहिल्या टप्प्यात २० हजार जागाराज्य शासनाने शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यात २० हजार जागा भरणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी राज्याच्या अर्थमंत्रालयाने रिक्त पदांच्या ८० टक्के जागा भरण्याची परवानगी दिलेली आहे. मात्र, शिक्षक भरती प्रक्रियेचे विविध टप्पे करण्याची योजना आखण्यात आली आहे.
पुढची प्रक्रिया होत नाहीपवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीसाठी ऑनलाईन नोंदणीच करून घेतली आहे. त्यानंतर पुढची प्रक्रिया काही होत नाही. निव्वळ प्रत्येक वेळा वेळ मारून नेली जात आहे.बिंदुनामावली तपासून आलेली असल्यामुळे तत्काळ प्रक्रिया पूर्ण करावी.- संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष, डी. एड्., बी. एड्. असोसिएशन.