औरंगाबाद : मोदी सरकारने अमानवी रेल्वे भाडेवाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना तिकीट काढून प्रवास करणेच अशक्य झाले आहे. आता जनतेला कायदेभंग करून फुकटात प्रवास करण्याशिवाय गत्यंतरच राहिले नाही. या जुलमी भाडेवाढीविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे असहकार आंदोलन हाती घेण्याचा इशारा राज्याचे वैद्यकीय शिक्षण व आरोग्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथे पत्रकारांशी बोलताना दिला. ‘कॉफी वुईथ स्टुडंटस्’ या कार्यक्रमानिमित्त आव्हाड शहरात आले असता, त्यांनी सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत रेल्वे भाडेवाढीवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, काँग्रेस आघाडी सरकार नेहमी गोरगरिबांच्या हिताचा विचार करीत होते. त्या सरकारने दरवाढ, भाडेवाढ केली तरी ती सर्वसामान्यांना जाचक ठरेल, अशी केलीनाही. भाजपा मात्र भारतासोबत नव्हे तर इंडियासोबत आहे. त्याचमुळे त्यांनी ही अमानवी दरवाढ केली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, शहराध्यक्ष मुश्ताक अहमद, एकनाथ गवळी, रामनाथ पाटील, सुधाकर बागूल, अभिषेक देशमुख, सुरजितसिंग खुंगर आदींची उपस्थिती होती. भाजपाचे खा. किरीट सोमय्या यांनी भाडेवाढीवर ‘चांगल्या गोष्टींसाठी किंमत मोजावीच लागते’ असे टिष्ट्वट केल्याचे सांगून आव्हाड म्हणाले की, भाजपाने आता अच्छे दिनला प्राईस टॅग लावला असून हे चांगले दिवस आणण्यासाठी केलेल्या जाहिरातीची खर्चवसुली सुरू केली आहे. त्यामुळे जनता आता फुकटातच प्रवास करील. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फुकटातच रेल्वे प्रवास करावा, असे आवाहनही त्यांनी केले.जनतेचे कंबरडे मोडणाऱ्या भाडेवाढीचे समर्थन करताना हा निर्णय यूपीए सरकारने घेतला होता, असे भाजपावाले सांगत आहेत, असे सांगून आव्हाड म्हणाले की, यूपीएच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी जनतेने तुम्हाला निवडले नाही. जुन्या सरकारचे निर्णय खोडून काढायला तुम्हाला कोणी रोखले आहे.एकही जागा कमीहोऊ देणार नाहीराज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ५०० जागा कमी करण्याचा निर्णय एमसीआयने घेतला आहे; परंतु आम्ही तसे होऊ देणार नाही. राज्यातील एकही जागा कमी होणार नाही, याची हमी मी देतो, असे सांगून आव्हाड म्हणाले की, प्राध्यापकांच्या रिक्त जागा ३० दिवसांत भरण्याची प्रक्रिया आम्ही पूर्ण करू. ज्या सुविधांची कमतरता आहे, त्या पूर्ण करू. राज्यातील एकही जागा कमी होणे हा आपला अवमानच ठरेल.आम्हाला जागा वाढवून हव्यातकाँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीत जागा वाटपाचा २००९ चा फॉर्म्युला असेल का, असे विचारता त्यांनी आम्हाला आता जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत, असे उत्तर दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलणार काय, असे विचारता त्यांनी उत्तर देणे टाळले.
रेल्वे भाववाढीला जनतेने कायदेभंगाने उत्तर द्यावे का?
By admin | Published: June 24, 2014 12:56 AM