औरंगाबाद : महापालिकेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी व सर्व कामे वेळेत होण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी गुरुवारी मोठे फेरबदल केले. अतिरिक्त आयुक्त-१ बी.बी. नेमाने यांच्याकडे दहा लाखांपर्यंतचे प्रशासकीय व वित्तीय प्रस्तावाला मंजुरी देण्याचे अधिकार दिले. त्यावरील रकमेच्या संचिका मुख्य लेखाधिकाऱ्यांच्या अभिप्रायानंतर विभागप्रमुखांनी आयुक्तांकडे सादर कराव्यात, असे आदेश त्यांनी दिले.
अतिरिक्त आयुक्त-१ यांना आयुक्तांचे अधिकार प्रदान करण्यात येत आहेत. त्यांना दहा लाखांपर्यंतचे महसुली व भांडवली खर्चासाठी प्रशासकीय, वित्तीय व निविदा मान्यतेचे पूर्ण अधिकार प्रदान करण्यात येत आहेत. महापालिकेतील सर्व विभागांनी दहा लाखापर्यंतचे प्रशासकीय व वित्तीय प्रस्ताव मुख्य लेखाधिकारी यांच्या मार्फत अतिरिक्त आयुक्त-१ यांच्याकडे मंजुरीसाठी सादर करावेत. त्यावरील रकमेच्या संचिका मुख्य लेखाधिकारी यांच्या अभिप्रायानंतर विभागप्रमुखांनी आयुक्तांकडे सादर कराव्यात, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यासोबतच विभागप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे, लेखा विभागप्रमुख मुख्य लेखाधिकारी संजय पवार, लेखा परीक्षण विभागप्रमुख मुख्य लेखा परीक्षक डी. के. हिवाळे, नगररचना विभागप्रमुख सहायक संचालक नगररचना हे राहतील. उपायुक्त अपर्णा थेटे यांच्याकडे आस्थापना विभागातील वर्ग ३ आणि ४ मधील सर्व कामांची जबाबदारी सोपविली.
नेमाने यांच्याकडे तीन विभाग
अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने यांच्याकडे नगरसचिव, कर वसुली व निर्धारण, बी.ओ.टी या तीन विभागांची जबाबदारी सोपविण्यात आली.
पानझडे स्मार्ट सिटीचे नोडल अधिकारी
शहर अभियंता सखाराम पानझडे हे ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत. आयुक्तांनी त्यांच्याकडे स्मार्ट सिटीचे नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. तसेच दक्षता कक्षाचे प्रमुख म्हणून एम.बी.काझी हे राहतील.