एमआयएम नगरसेवक मतीन यांच्या उपस्थितीवरून मनपाच्या सर्वसाधारण सभेत गदारोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 01:42 PM2018-11-01T13:42:07+5:302018-11-01T13:46:19+5:30
या गदारोळामुळे महापौरांनी सुमारे पंधरा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द केले.
औरंगाबाद: महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना पुन्हा एकदा प्रवेश नाकारण्यात आला. भाजपा नगरसेवकांनी त्यांना प्रवेश देण्यास कडाडून विरोध केला तर मतीन यांच्यावरील कारवाई रद्द करण्यात यावी या मागणीसाठी एमआयएम नगरसेवकांनी सभागृहात ठिय्या आंदोलन केले. या गदारोळामुळे महापौरांनी सुमारे पंधरा नगरसेवकांचे सदस्यत्व एका दिवसासाठी रद्द केले.
आज महापालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यात शहरातील विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठा व मालमत्ता कर, पाणीपट्टी वसुली असे प्रश्न चर्चिले जाणार आहेत. सकाळी सभेला सुरुवात होताच भाजपचे गटनेते प्रमोद राठोड यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बद्दल गैरउद्गार काढणारे एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना सर्वसाधारण सभेत प्रवेश देण्यात येऊ नये अशी मागणी केली.
त्यावर एमआयएम, काँग्रेस नगरसेवकांनी आक्षेप घेतला. मतीन यांना सभागृहात मारहाण झाली होती. ज्या सदस्यांनी त्यांना मारहाण केली त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. मात्र महापौरांनी मतीन यांना प्रवेश न देण्याचा निर्णय कायम ठेवल्याने एमआयआय नगरसेवकांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर सुमारे 15 नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय महापौरांनी घेतला.
खुर्च्यांची केली तोडफोड
सदस्यत्व रद्द केल्यानंतर बाहेर पडणाऱ्या नगरसेवकाने खुर्च्यांची तोडफोड केली. त्यामुळे सभागृहाबाहेर काही काळ तणाव निर्माण झाला होता.