औरंगाबाद : सहकार खात्याने राज्य सरकारला जो गुप्त अहवाल पाठवला, त्यात व ऑडिट रिपोर्टमध्ये कुठेच संचालक मंडळाने गैरव्यवहार केला, असे नमूद केले नाही. आम्ही कोणता गैरव्यवहार केला हे दाखवून द्यावे, असे आव्हान कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राधाकिसन पठाडे यांनी राज्य सरकारला दिले आहे.
यासंदर्भात पठाडे यांनी सांगितले की, एक तक्रारीच्या आधारे राज्य सरकारने सहकार खात्यामार्फत गुप्त अहवाल मागितला. जाधववाडी येथील कृषी उत्त्पन्न बाजार समितीत संचालकांनी केलेल्या विकासकामाचा अहवाल मागितला व आम्ही कोट्यवधींचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत आमचे संचालक मंडळ रद्द केले. सहकार खात्याने संचालक मंडळाची कोणतीही चौकशी न करता अहवाल दिला. माहितीच्या अधिकारात तो अहवाल आम्ही प्राप्त केला, पण त्यात आम्ही गैरव्यवहार केल्याचे कुठेच नमूद केले नाही. अनियमितता म्हणजे गैरव्यवहार नव्हे. राज्य सरकारने सूडबुद्धीने कारवाई केली व बाजार समितीवर प्रशासक बसवले याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.