औरंगाबाद : अगोदर आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडा. त्यानंतर वैयक्तिक अडचणी मांडा. कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. मात्र, ज्यासाठी आपण नोकरी करतो, ते आधी करणे गरजेचे आहे, असा सल्ला नवे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी दिला.
गटणे यांनी नव्याने पदभार स्वीकारला. त्यामुळे कर्मचारी, संघटना शुभेच्छांसाठी येत आहेत. हे कर्मचारी केवळ समस्या मांडत आहे. उमेद कंत्राटी कर्मचारी कल्याणकारी मंडळाचे पदाधिकारी बुधवारी दुपारी गटणे यांना भेटले. त्यांनी पुनर्नियुक्तीत देण्यात आलेला १२ दिवसांचा खंड कमी करण्याची मागणी केली. अशाच स्वरूपाच्या मागण्या कर्मचारी घेऊन येत असल्याने ‘कामाला प्राथमिकता आणि वैयक्तिक समस्या नंतर मांडा’, असा सल्ला गटणे यांनी दिला.
माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, विभागांचे काम, प्रगती, त्यांच्या कामातील अडथळे आणि समस्या पहिल्यांदा समजून घेत आहे. नंतर लोकप्रतिनिधी, नागरिकांचे म्हणणे ऐकून ठोस निर्णय घेऊ.