औरंगाबाद: शाळेमध्ये अवघ्ये ४७ विद्यार्थी असताना त्यापेक्षा कितीतरी पट अधिक विद्यार्थी शाळेत शिकत असल्याचे दाखवून पिसादेवी रस्त्यावरील एका शाळेने शालेय पोषण आहाराचे तब्बल १५ लाख ९५ हजार ३४३ रुपये उचलून शासनाची फसवणुक केल्याचे समोर आले. याविषयी सिडको ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
सिडको पोलिसांनी सांगितले की, पिसादेवी रस्त्यावर भगवान महावीर प्राथमिक शाळा कार्यरत आहे. पहिली ते चौथीपर्यंत तेथे केवळ ४९ विद्यार्थी आहेत. असे असताना याशाळेच्या मुख्याध्यापक आणि कर्मचाºयांनी त्यापेक्षा कितीतरी पट अधिक विद्यार्थी शाळेत शिकत असल्याचे बनावट रेकॉर्ड तयार केले. त्या रेकॉर्डच्या आधारे २०१४पासून शाळेला शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शासनाकडून नियमित पैसे मिळत होते.
दरम्यान डिसेंबर महिन्यात पंचायत समितीमधील गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील शालेय पोषण आहार विभागाचे अधीक्षक बी.ए.देशपांडे यांनी अचानक भगवान महावीर शाळेला भेट देऊन तेथे प्रत्यक्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेतली तेव्हा त्यांना धक्काच बसला. पहिली ते चौथीपर्यंत केवळ ४९ विद्यार्थी शाळेत शिकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
याविषयी देशपांडे यांनी याविषयी शाळेच्या मुख्याध्यापकास जाब विचारणा केली तेव्हा त्यांनी त्यांना उडवा,उडवीची उत्तरे दिली. शाळेने बोगस पटसंख्या दाखवून २०१४ ते २०१८ या कालावधीत तब्बल १५लाख ९५ हजार ३४३रुपये उचलल्याचे समोर आले. याप्रकरणी देशपांडे यांनी थेट सिडको ठाण्यात मुख्याध्यापकाविरोधात शासनाची फसवणुक करणे, बनावट कागदपत्रे तयार करून ते खरे असल्याचे भासविणे आदी कलमानुसार गुन्ह्याची नोंद केली.