छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ’स्वच्छता ही सेवा’अंतर्गत मोहिमेत राष्ट्रीय सेवा योजनेच्या साडेपाचशे स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह अधिकारी, प्राध्यापक यांनी सहभागी होऊन तासभर श्रमदान केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम रविवारी सकाळी १० ते ११ दरम्यान आयोजित केला होता. श्रमदानाची सुरुवात मुख्य इमारतीसमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. यावेळी प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. भगवान साखळे, अधिष्ठाता डॉ. भालचंद्र वायकर, डॉ. वाल्मिक सरवदे, रासेयो संचालक डॉ. सोनाली क्षीरसागर, प्राचार्य डॉ. कैलास इंगळे, जिल्हा समन्वयक डॉ. निर्मला जाधव, डॉ. ज्ञानेश्वर पाथ्रीकर, डॉ. संजय कवडे यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्यासह सर्व संवैधानिक अधिकारी, प्राध्यापकांनी स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेऊन श्रमदान केले. सुमारे एक तासभर श्रमदान करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यापीठातील पूर्णाकृती पुतळ्यासमोर रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, मुंबई विद्यापीठाचे प्रकलगुरू डॉ. अजय भामरे, डॉ. राजेश रगडे, आदींची उपस्थिती होती. डॉ. सोनाली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. संजय शिंदे यांनी आभार मानले. शेवटी कुलगुरू यांनी सर्व उपस्थित स्वयंसेवकांना स्वच्छतेची शपथ दिली.