माजलगाव : समाजकल्याण विभागामार्फत तालुक्याला उपलब्ध झालेल्या दीड कोटी रुपयांच्या निधीचे श्रेय घेण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार स्पर्धा रंगली आहे. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करुन राजकीय वातावरण तापवले आहे.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून तालुक्यासाठी विविध कामांकरता १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळाल्याचा दावा खुद्द माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांनी केला होता. या निधीच्या उपलब्धतेची माहिती पत्रकार परिषद घेऊन देतानाच त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी सोडली नाही.माजलगावचे आ. आर. टी. देशमुख यांच्यावर केलेला वार भाजपच्या जिव्हारी लागला. त्यानंतर भाजपचे तालुकाध्यक्ष हनुमंत कदम यांनी ‘फुकटचे श्रेय घेण्याचा प्र्रयत्न करु नका’ असा चिमटा काढला. विश्वासार्हता नसल्यानेच जनतेने आपल्याला बाजूला सारल्याचे सांगत त्यांनी सोळंकेवर थेट निशाणा साधला. रायुकॉचे तालुका उपाध्यक्ष शशिकांत मस्के यांनी कदमांचा वार परतावून लावण्यासाठी काढलेल्या पत्रकात खरमरीत टीका केली. ते म्हणतात, साधे सरपंचपद मिळवता आले नाही, त्यांनी श्रेयाच्या गप्पा मारु नयेत. राष्ट्रवादीमुळेच निधी उपलब्ध झाल्याचे सांगून त्यांनी आपली उंची बघून आरोप करा... असा टोला लगावला. सोळंकेंवर केलेले आरोप खोडून टाकतानाच त्यांनी भाजपचे धोरण शासनविरोधी असल्याची कोपरखळीही मारली. (वार्ताहर)
श्रेयासाठी माजलगावात भाजप- राकाँमध्ये जुंपली
By admin | Published: February 22, 2016 12:17 AM