छत्रपती संभाजीनगर : अयोध्यातील श्रीराम जन्मभूमी निर्माणधीन मंदिरात २२ जानेवारीला श्रीरामाच्या बालरूपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यामुळे सर्वत्र ‘राममय’ वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील कोंदलकर परिवाराच्या देवघरात तब्बल १६१ वर्षे जुना एक आणा असून त्यावर ‘श्रीराम दरबार’ साकारला आहे. उल्लेखनीय म्हणजे, हा आणा चक्क ईस्ट इंडिया कंपनीने तयार केला होता.
अहिंसानगरातील रहिवासी रमेश कोंदलकर यांनी हा शिक्का जिवापाड जपले आहे. ईस्ट इंडिया कंपनीने १८६२ मध्ये हे नाणे चलनात आणले होते. तांबे व पितळापासून तयार केलेल्या या शिक्क्याचे वजन २० ग्रॅम आहे. नाण्याच्या एका बाजूला ईस्ट इंडिया कंपनीचे नाव १ आणा असे कोरलेले आहे, तर दुसऱ्या बाजूला श्रीराम, सीता, लक्ष्मण व हनुमान यांचे चित्र साकारले आहे. हे अनमोल नाणे कोंदलकर परिवाराने खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी दाखविले आहे. याशिवाय त्यांच्याकडे एक रामभक्त हनुमानाची पंचधातूची जुनी मूर्ती असून त्याचे वैशिष्ट्य म्हणजे उजव्या हाताने आशीर्वाद देत आहे, तर डावा हात कंबरेवर ठेवलेला आहे. ही उभी मूर्ती ४ इंचांची आहे. पाच पिढ्यांपासून या मूर्तीची पूजा केली जात आहे.