औरंगाबाद : बहुचर्चित वर्धन घोडे खून खटल्याप्रमाणे श्रीकांत शिंदेच्या खुनाचा तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात खटला चालवा आणि आरोपींना कठोर शिक्षा कशी होईल, याकरिता प्रयत्न करा, अशी मागणी मृत श्रीकांतच्या नातेवाईकांसह शिवसेनेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे सोमवारी केली.
पुंडलिकनगर रस्त्यावर शिवजयंती मिरवणुकीत झेंडा हिसकावण्यावरून झालेल्या भांडणानंतर पाच आरोपींनी श्रीकांत गोपीचंद शिंदे या २१ वर्षीय तरुणाचा चाकूने भोसकून खून केला होता. याप्रकरणात पुंडलिकनगर पोलिसांनी आरोपी राहुल भोसले, छोटू ऊर्फ विजय वैद्य, ऋषिकेश बाळू काळवणे, नवनाथ ऊर्फ टोण्या शेळके आणि प्रेम सहारेला यापूर्वीच अटक केली.
श्रीकांतचे वडील गोपीचंद शिंदे, आई विमल, भाऊ सूरज, मयूर शिंदे यांच्यासह उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेविका मीना गायके, विभागप्रमुख बापू कवळे, भास्कर खेंडके, साईनाथ जाधव, मीरा देशपांडे आदींच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची सोमवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी वर्धन घोडे खून खटल्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे या खुनाचा तपास द्यावा, वर्धन घोडे खून खटल्याप्रमाणे श्रीकांतच्या मारेकऱ्यांविरुद्ध सबळ पुराव्यासह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करा आणि आरोपींना जामीन मिळू देऊ नका,अशी विनंती केली.
कठोर शिक्षेसाठी प्रयत्न- पोलीस आयुक्तपोलीस आयुक्त म्हणाले की, श्रीकांतच्या खुनातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा तपास प्राथमिक टप्प्यात आहे. आरोपींना कठोर शिक्षा होईल,असे पुरावे पोलिसांकडून जमा केले जात आहे, तसेच त्यांना जामीन मिळणार नाही, याकरिताही आम्ही प्रयत्न करू,अशी ग्वाही त्यांनी शिष्टमंडळास दिली.
खुनाच्या गुन्ह्यातील पाचव्या आरोपीला पोलीस कोठडीशिवजयंतीच्या मिरवणुकीत झेंडा फिरविण्याच्या कारणावरून श्रीकांत शिंदे या तरुणाचा खून झाला होता. या गुन्ह्यातील पाचवा आरोपी अभिजित ऊर्फ प्रेम कैलास सहारे (२४, रा. भारतनगर, गारखेडा परिसर) याला सोमवारी (दि. २४) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. वाडकर यांनी दि.२७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सहायक सरकारी वकील गौतम कदम यांनी सरकारतर्फे काम पाहिले.या गुन्ह्यात यापूर्वी विजय ऊर्फ छोटू वैद्य (२६, रा. बजरंगनगर), राहुल भोसले (२५, रा. शिवाजीनगर), ऋषिकेश काळवणे (२१, रा. गारखेडा) आणि नवनाथ ऊर्फ टोन्या शेळके (२४, रा. भारतनगर, गारखेडा परिसर) या चौघांना दि.२५ फेबु्रवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत.