शिऊर ते श्रीरामपूर राज्य महामार्गावरील वीस किलोमीटर अंतराच्या दुरुस्तीसाठी फडणवीस सरकारच्या काळात मंजुरी मिळून निविदा प्रक्रिया पार पडली होती. तत्कालीन विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाले. मात्र, निवडणुकीत सत्तापालट होताच महाविकास आघाडी सरकारने मार्च २०२० पर्यंतची सर्व कामे थांबविली. परंतु दरम्यानच्या काळात खासदार इम्तियाज जलील यांच्यामार्फत दिल्लीत पाठपुरावा करून प्रधानमंत्री विशेष दुरुस्तीअंतर्गत वैजापूर-पुरणगाव या सव्वीस किलोमीटर कामासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करुन घेतला. दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य संजय ठोंबरे यांनी बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे या रस्त्याबाबत पाठपुरावा केला. अखेर मंत्री चव्हाण यांनी रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ आदेश दिला. त्यामुळे बांधकाम विभागाच्या वतीने नऊ डिसेंबरला शिऊर श्रीरामपूर या रस्त्यासाठी सहा कोटी ४० लाख व वैजापूर ते पुरणगाव या रस्त्यासाठी पाच कोटी निधी दुरुस्तीच्या कामाचा कार्यारंभ आदेश दिला. या आठवडाभरात रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होणार आहे.
फोटो - वैजापूर-पुरणगाव रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात करण्यात आली असून यावेळी जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील यांची उपस्थिती होती.