लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जुना कौठा येथील लक्ष्मीनृसिंह मंदिराने धार्मिक कार्यक्रमाला सामाजिकतेची झालर देत कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी आयोजित सामूहिक तुळसी विवाहात आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या दोन जोडप्यांवर अक्षदा टाकल्या़ या आगळ्यावेगळ्या सोहळ्यात अख्खा कौठा परिसरच हिरिरीने सहभागी झाला होता़कौठा परिसरातील नरोबा मंदिराला ३०० वर्षांची परंपरा आहे़ हे कौठावासियांचे ग्रामदैवत असून वर्षभर या ठिकाणी विविध कार्यक्रम घेतले जातात़ प्रत्येक सोहळ्यात सामाजिक जाणीव जपत मंदिराच्या वतीने गरजूवंतांना मदतीचा हात दिला जातो़ सामुदायिक तुळसी विवाहाच्या निमित्ताने मंदिराच्या वतीने दरवर्षी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या वधू-वरांचे विवाह एक रुपयाही न घेता लावून देण्यात येतात़ त्यांना संसारोपयोगी साहित्य, जेवणावळी हा सर्व खर्च मंदिराच्या वतीने करण्यात येतो़शनिवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मंदिराच्या आवारातच या सोहळ्याला सुरुवात झाली़ त्यात साईनाथ माने याचा विवाह चंद्रपूर येथील शीतल जाधव यांच्याशी तर अभिजित काळे यांचा विवाह परभणी येथील भाग्यश्री राळेकर यांच्याशी थाटामाटात पार पडला़ लग्नसोहळ्यात कुठलाही मानपान न करता प्रत्येकजण तो चांगला होण्यासाठी हातभार लावत होता़ यावेळी नगरसेवक राजू काळे यांनी नवदाम्पत्यांना संसारोपयोगी साहित्य दिले़ सोहळ्याला नगरसेवक राजू गोरे, सिद्धार्थ गायकवाड, दिलीप कंदकुर्ते, अध्यक्ष गंगाप्रसाद काकडे, पुजारी शंकर स्वामी मुंगावकर, नीळकंठ काळे, मारोती पासवाड, अशोक दिलेराव, भारत काकडे, गणेश काकडे यांची उपस्थिती होती़
सामुदायिक तुलसी विवाहात दोन जोडप्यांचे शुभमंगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:20 AM