औरंगाबाद : औरंगाबादची आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू श्वेता जाधव हिची पश्चिम विभागीय सिनिअर महिला संघाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद येथील मध्यमगती गोलंदाज प्रियंका गारखेडे हिचाही सिनिअर महिलांच्या पश्चिम विभागीय क्रिकेट संघात समावेश करण्यात आला आहे.केरळ येथे १८ मार्च ते ५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या इंटरझोनल स्पर्धेसाठी बडोदा येथे झालेल्या निवड समितीच्या बैठकीत नुकताच पश्चिम विभागीय महिला संघ निवडण्यात आला. हा संघ पश्चिम विभागीय निवड समितीचे चेअरमन तृप्ती भट्टाचार्य (मुंबई), प्रदीप देशमुख (महाराष्ट्र), भागीरथ ठाकूर (गुजरात), महेश चौहान (सौराष्ट्र), राजकुवरदेवी गायकवाड (बडोदा) यांनी निवडला. समन्वयक म्हणून स्नेहल पारीख होते.पश्चिम विभागीय संघात उपकर्णधारपदी निवड झालेल्या औरंगाबादच्या श्वेता जाधव हिने गत हंगाम चांगलाच गाजवला आहे. गतवर्षी डिसेंबर महिन्यात तुल्यबळ असणाºया मुंबईविरुद्ध बीसीसीआयच्या सिनिअर वनडे क्रिकेट स्पर्धेत श्वेता जाधव हिने ९६ चेंडूंतच १२ चौकार आणि एका षटकारांसह झंझावाती शतकी खेळी करीत महाराष्ट्राला सनसनाटी विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली आहे. त्याचप्रमाणे तिने यावर्षी जानेवारी महिन्यात बीसीसीआयच्या महिला ट्वेंटी २0 क्रिकेट स्पर्धेत दिल्ली आणि गोवा संघाविरुद्ध आपला विशेष ठसा उमटवताना महाराष्ट्राच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. दिल्ली संघाविरुद्ध तिने ४६ आणि गोवा संघाविरुद्ध ४0 धावांची स्फोटक खेळी केली होती. श्वेता जाधव हिने याआधी २00५-२00६ मध्ये भारताच्या २१ वर्षांखालील क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करीत पाकिस्तान संघाविरुद्ध नेत्रदीपक अर्धशतकी खेळी केली होती. त्याचप्रमाणे तिने २0१४ साली श्रीलंका अ संघाविरुद्ध भारत अ संघाचे प्रतिनिधित्व केलेले आहे, तसेच २0१२ मध्ये झालेल्या चँलेंजर ट्रॉफीत श्वेता जाधवने ग्रीन इंडियाविरुद्ध इंडिया ब्ल्यू संघाचे प्रतिनिधित्व करताना ५७ धावांची आकर्षक खेळी केली होती.या संघात निवड झालेल्या औरंगाबादच्या प्रियंका गारखेडे हिनेदेखील अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आपला ठसा उमटवला आहे. पश्चिम विभागीय क्रिकेट संघात निवड झालेल्या श्वेता जाधव हिला प्रशिक्षक कर्मवीर लव्हेरा यांचे मार्गदर्शन लाभले आहे, तसेच प्रियंका गारखेडे हिला प्रशिक्षक दीपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वूमेन्स कमिटीचे चेअरमन प्रदीप देशमुख, औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव सचिन मुळे, सहसचिव शिरीष बोराळकर आदींनी या खेळाडूंचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.झोनल क्रिकेट स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला पश्चिम विभागीय क्रिकेट संघश्वेता हरनहाल्ली (कर्णधार), श्वेता जाधव (उपकर्णधार), हीना पटेल (यष्टीरक्षक), प्राजक्ता शिरवाडकर (यष्टीरक्षक), मुग्धा जोशी, भक्ती तामोरे, हुमरिझा काझी, सानिया राऊत, बी. श्रुती, पालक पटेल, रेणुका चौधरी, कृतिका चौधरी, जयश्री जडेजा, रिना ढाबी, प्रियंका गारखेडे. राखीव : श्रावी शाह, शेजल राऊत, नेहा चावडा, टी. शाह, खुशी भाटिया. प्रशिक्षक : अपर्णा कांबळी, सहायक प्रशिक्षक : रितुपर्णा रॉय.संधीचे सोने करणार : श्वेता जाधवकेरळ येथे होणाºया बीसीसीआयच्या सिनिअर महिला झोनल क्रिकेट स्पर्धेसाठी पश्चिम विभागीय संघात निवड होणे आणि उपकर्णधारपदाची जबाबदारी पेलण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. त्याचप्रमाणे ४ ते ५ वर्षांनंतर माझे पश्चिम विभागीय महिला क्रिकेट संघात पुनरागमन झाले आहे. त्यामुळे निश्चितच चांगली कामगिरी करीत संघाला जिंकून देण्यात योगदान देऊन संधीचे सोने करण्याचा माझा प्रयत्न असेल, मुख्य स्वप्न हे अर्थातच सिनिअर महिला भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे आहे, अशी प्रतिक्रिया पश्चिम विभागीय महिला क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी निवड झालेल्या औरंगाबादच्या श्वेता जाधव हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.