वैजापुर (औरंगाबाद ) : मोबाईल बॅटरीसोबत खेळत असताना अचानक स्फोट होऊन दोन बालके गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी ( दि. ६ ) सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली.
तालुक्यातील शिऊर येथील घोडके वस्ती येथे ही घटना घडली आहे. कृष्णा रामेश्वर जाधव (वय ८) व कार्तिक रामेश्वर जाधव (वय 5) अशी या बालकांची नावे आहेत. स्फोटात दोन्ही बालकांच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामेश्वर जाधव हे शिरूर पासून जवळ असलेल्या घोडके वस्ती येथे आपल्या कुटुंबासोबत राहतात. आज सकाळी त्यांची दोन मुले कृष्णा आणि कार्तिक घराबाहेर खेळत होते. त्यांना खेळताना एक मोबाईलची बॅटरी सापडली. दोघांनी उत्सुकतेने बॅटरी दगडाने फोडण्याचा प्रयत्न केला. दगडाच्या आघाताने बॅटरीचा अचानक स्फोट झाला. यात कृष्णा आणि कार्तिक दोघेही गंभीर जखमी झाले. स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने पर्रीसारातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच शेताकडे जाणाऱ्या रामेश्वर यांनी लागलीच मुलाकडे धाव घेतली. दोघांनाही शिरूर येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. येथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.