छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील वाघीण ‘समृद्धी’ तिसऱ्यांदा आई होणार आहे. यापूर्वी तिने दोन वेळेस तब्बल नऊ बछड्यांना जन्म दिला आहे. वाघिणीची गर्भधारणा ९० दिवसांची असते. पुढील १५ ते २० दिवसांत ती बछड्यांना जन्म देईल, असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला. बऱ्याच वर्षांनंतर प्राणिसंग्रहालयात पाळणा हलणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
प्राणिसंग्रहालयात तीन वाघ, सात वाघिणी आहेत. त्यांतील एक वाघीण म्हणजे समृद्धी होय. समृद्धीने सर्वप्रथम चार बछड्यांना जन्म दिला होता. हे बछडे मोठे झाल्यावर देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयांना देण्यात आले. त्यानंतर कोरोना संसर्गापूर्वी समृद्धीने पाच बछड्यांना जन्म दिला होता. हे बछडेही दुसरीकडे पाठविण्यात आले. प्राणिसंग्रहालयात वाघांना लागणारी जागा उपलब्ध नसल्याने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या निर्देशानुसार प्रजनन थांबविण्यात आले होते. तीन वर्षांपासून वाघ आणि वाघिणींना वेगळे ठेवण्यात आले होते. सध्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मिटमिटा येथे १०० एकर जागेवर भव्य सफारी पार्क उभारण्याचे काम सुरू आहे. पुढील दीड वर्षात सफारी पार्क पूर्ण होईल. त्यामुळे महापालिकेला वाघ मोठ्या संख्येने लागणार आहेत. भविष्याचा विचार करून अलीकडेच उपलब्ध वाघांचे प्रजनन सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. समृद्धी वाघीण गरोदर असल्याचे निदर्शनास आले. तिच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. गरोदरपणात तिची ज्या पद्धतीने काळजी घ्यायला हवी, तशी काळजीही घेतली जात असल्याचे सूत्रांनी नमूद केले.
प्राणी नेण्यास पाच वर्षे लागतीलमिटमिटा येथे सफारी पार्क उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतरही विविध प्राणी त्वरित स्थलांतरित करणे शक्य होणार नाही. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण परवानगीही देणार नाही; कारण प्राण्यांना लागणारी नैसर्गिक जागा तयार होत नाही, तेव्हापर्यंत त्यांना तेथे नेता येत नाही. गवत, झाडांची उंची, तापमान, पोषक वातावरण, इ. बाबींचा विचार केला जातो. त्यानंतरच प्राणी स्थलांतरित होतात.