औरंगाबाद : आपल्या अभिनयाने प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करणारा मराठी चित्रपटसृष्टीतील हॅण्डसम बॉय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि हसरी, अवखळ, गुणवंत अभिनेत्री स्पृहा जोशी यांनी मंगळवारी शहरातील शेकडो सखींशी मनमुराद ‘गप्पा-टप्पा’ मारल्या. निमित्त होते लोकमत सखी मंचतर्फे या सिनेतारकांसोबत आयोजित केलेल्या ‘गप्पा टप्पा’ या कार्यक्रमाचे. यावेळी या जोडीने आपल्या चित्रपटातील अनेक पैलू सखींसमोर उलगडले.‘लॉस्ट अॅण्ड फाउंड’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने लोकमत हॉल, लोकमत भवन, जालना रोड येथे सायंकाळी ५ वाजता आयोजित या कार्यक्रमास अभिनेता सिद्धार्थ चांदेकर, अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्यासह लेखक,दिग्दर्शक ऋतुराज धालगडे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोघांना बघण्याची , भेटण्याची आणि त्यांच्याशी ‘गप्पा टप्पा’ मारून त्यांना अनुभवण्याची संधी यानिमित्ताने तमाम सखींना मिळाली.ज्याच्याशी मनमुराद बोलावे वाटते, ज्याला काही तरी सांगावे वाटते,अशा व्यक्तींच्या भावनांची गोष्ट सांगणारा मराठी चित्रपट ‘लॉस्ट अॅण्ड फाउंड’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. इंग्रजी नावावरून चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण होत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर माणसांची गर्दीदेखील वाढत आहे. मात्र, या गर्दीत माणसं एकाकी होत आहेत. अशा एकाकी पडलेल्या व्यक्तीला फक्त हवे असते त्याचा एकटेपणा दूर करणारा, त्याला समजून घेणारा. सिद्धार्थ आणि स्पृहा यांच्या अभिनयाने नटलेल्या चित्रपटातील याच विषयाशी, त्यातील भूमिका आणि चित्रपटातून मिळणारा संदेश याविषयी त्यांनी मनमोकळेपणाने संवाद साधला.यावेळी सिद्धार्थ चांदेकर म्हणाला, काही तरी गमावल्यानंतरही त्याविषयी सांगितले जात नाही. ते सर्व मनात साचून राहते. त्यातूनच दडपण निर्माण होते. आई आणि मुलींनी एकमेकांशी काही गोष्टी आवर्जून शेअर केल्या पाहिजे. आपण एकमेकांसाठी खास आहोत, हे दाखविले पाहिजे,असे तो म्हणाला.स्पृहा जोशी म्हणाली, फेसबुक, व्हॉटस् अॅपच्या माध्यमातून अनेक मित्र असतात. मात्र, धावपळीच्या युगात एकमेकांना वेळ देऊ शकत नाही. प्रत्येक जण कधीना कधी एकटा पडतो. अशावेळी त्यास केवळ सहानुभूती न देता त्याला वेळ दिला पाहिजे, त्याला त्याच्या क्षमता सांगितल्या पाहिजे. जर कोणाला एकटे वाटत असेल त्यास वेळीच मदत केली पाहिजे,असे स्पृहा जोशी म्हणाली. ऋतुराज धालगडे म्हणाले, एकटेपणा जाणवतो, तेव्हा कोणीतरी आपले मन जाणून घ्यावेसे वाटते. हीच थीम चित्रपटात आहे. आपल्या आवडत्या कलाकारांची भेट सखी मंचच्या सदस्यांसाठी ही जणू पर्वणीच ठरली. यावेळी नीता पानसरे यांनी या कलावंतांची मुलाखत घेतली.
सिद्धार्थ,स्पृहाने मारल्या सखींशी ‘गप्पा-टप्पा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2016 11:54 PM