दौलताबाद : ऐतिहासिक दौलताबाद किल्ल्याच्या पाठीमागील परिसराला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागली. शेकडो एकर परिसरात ही आग झपाट्याने पसरल्याने यात लाखमोलाची वनसंपदा नष्ट झाली आहे. दुपारी उन्हाचा पारा अधिक असल्याने आग झपाट्याने वाढल्याने त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. यासह काही भागात अग्निशमन दलाची गाडी जाऊ न शकल्याने सायंकाळी उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु होते.
किल्ल्याच्या पाठीमागील भागात दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी घटना स्थळांकडे धाव घेत आग विझविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र, या भागात मोठ्या प्रमाणात रानतुळशीची वाळलेली झाडे व गवत असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आगीवर नियंत्रण मिळणे कठीण असल्याचे लक्षात आल्याने नागरिकांनी औरंगाबाद अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. वाळलेल्या गवतामुळे आग वाढत गेली होती. या आगीत शेकडो छोटी, मोठी झाडे, झुडपांसह अनेक सरपटणारे प्राणीही जळून खाक झाले. आग वाढत जाऊन नर्सरीपर्यंत पोहोचल्यानंतर ती पुढे सरकू नये यासाठी वनरक्षक आर.एस. मुळे यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दल जिथपर्यंत पोहोचते तिथपर्यंत आग आटोक्यात आली. मात्र, किल्ल्याच्या ज्या भागात अग्निशमन दल पोहोचू शकले नाही, त्या भागात आग धुमसतच होती. या आगीमुळे दौलताबाद गावासह परिसरात धुराचे लोळ उठले होते. या भागातून जाणाऱ्या वाहनधारकांना धुरामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
वाहतूक विस्कळीत झालीदौलताबाद घाटाखाली आम मशिदीजवळ औरंगाबाद- खुलताबद रस्त्यावर दोन्ही बाजूंनी आग पसरल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी दौलताबाद पोलीस उपनिरीक्षक रवी कदम व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.