येरमाळा : सध्या जिल्ह्याभरात लोकसहभागासोबतच विविध संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींच्या पुढाकारातून ओढे, नदी, नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, तेरखेडा येथून उगम पावलेल्या तेरणा नदीपात्राच्या तेरखेडा ते हळदगाव या दरम्यानचे खोलीकरण, रुंदीकरण करण्याबाबत कमालीची उदासीनता दिसून येत आहे. नदीपात्राला सध्या झाडा-झुडपांनी वेढले असून, बारा-पंधरा मिटरचे हे पात्र गाळामुळे केवळ तीन मिटरवर आले आहे. वाशी तालुक्यातील तेरखेडा येथून उगम पावलेली तेरणा नदी जिल्ह्यासाठी वरदायिनी म्हणून ओळखली जाते. येरमाळा महसूल क्षेत्रातील रत्नापूर, येरमाळा, पानगाव, उपळाई, संजीतपूर, सापनाई, शेलगाव (डि), भोसा, बारातेवाडी, शेलगाव, तर मोहा महसूल क्षेत्रातील दहिफळ, गौर, सातेफळ, सौंदणा या गावांच्या शिवारातून हीनदी जाते. दुधगाव येथून पुढे या नदीच्या खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, तेरखेडा (ता. वाशी) ते हाळदगावपर्यंत नदी लहान मोठ्या काटेरी झाडाझुडपांनी वेढली असून, पावसाळ्यात वाहून येणाऱ्या गाळामुळे १० ते १५ मीटरचे रुंदीचे नदीचे पात्र आत केवळ तीन-साडेतीन मीटरवर आले आहे.येरमाळा महसूल क्षेत्रात येणाऱ्या रत्नापूर शिवारात चार सिमेंट नालाबंधारे, एक कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा, तर येरमाळा-पानगाव शिवारात एक कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा असे चार सिमेंट नालाबंधारे आणि तीन कोल्हापुरी बंधारे असे एकूण सात बंधारे आहेत. येरमाळा, पानगाव, रत्नापूर शिवारातील कोल्हापुरी बंधाऱ्याऱ्याचे दरवाजे गायब असून, सिमेंट नाला बंधारेही गाळाने भरून त्यांना गळती लागली आहे. त्यामुळे या भागात पडणारे पावसाचे पाणी आले तसे वाहून जाते. मध्यंतरी कृषी विभागामार्फत सुरू झालेल्या जलयुक्त शिवार योजनेत तेरणा नदीच्या खोलीकरण, रुंदीकरण, सरळीकरणासाठी काही स्थानिक लोकांनी प्रयत्नही केले. मात्र, कृषी विभागाने कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे या ठिकाणी जि.प. लघु पाटबंधारे विभाग काम करू शकतो असे सांगितले. तर जि.प. लघु पाटबंधारे विभागाने या नदीवर सिमेंट नाला बांध असल्याने कृषी विभागच येथे काम करू शकतो, असे सांगितले. त्यामुळे या दोन खात्याच्या वादात नदीच्या खोली, रुंदी व खोलीकरणाची कामे रखडल्याचे गावपुढाऱ्यांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)
‘तेरणा’ला झुडपांचा वेढा
By admin | Published: May 31, 2016 11:24 PM