पैठण (औरंगाबाद ) : पैठण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य भरणा लाईनमधून अनधिकृतपणे घेतलेले दहा वीस तीस नव्हे तर तब्बल ५०० नळ कनेक्शन मंगळवारी नगर परिषद प्रशासनाने तोडले. भरणालाईनवर अवैध नळ कनेक्शनची संख्या वाढल्याने पैठण शहरातील जलकुंभ भरण्यास अतिरिक्त वेळ लागत होता. यामुळे शहरात पाण्याची बोंबाबोंब सुरू होती.
जायकवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून जलवाहिनी द्वारे पैठण शहरास पाणी पुरवठा करण्यात येतो. नँशनल हायवे ७५२ पैठण औरंगाबाद या रस्त्यावर समांतर अशी १२.५ किमी लांबीची जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या दरम्यान अनेक व्यावसायिकांनी रोडवर विविध उद्योग थाटले आहेत. शिवाय निवासी घरे, छोटेमोठे उद्योग, मंगल कार्यालये उभारण्यात आली आहे. यातील बहुतेकांनी नगर परिषदेच्या मुख्य भरणा लाईन वरून अवैध रित्या नळ कनेक्शन घेतल्याने पैठण शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडले होते.
वेळेत शहरातील जलकुंभ भरत नसल्याने काही भागात अनियमित, कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता. यामुळे शहरभर नगर परिषदेच्या नावाने बोंबाबोंब सुरू होती. पाणीपुरवठा निरीक्षक संकटी पापुलवार यांनी पथकासह दोन दिवस मुख्य जलवाहिनीची पाहणी केल्यानंतर अनधिकृत नळ कनेक्शनचे गौडबंगाल समोर आले.मंगळवारी पाणीपुरवठा निरीक्षक व्यंकटी पापुलवार यांनी विशेष पथकासह डावा कालवा ते पाचोड फाटा या दरम्यान असलेले सर्व अनधिकृत नळ कनेक्शन तोडले. संबंधितांनी अवैधरित्या नळ कनेक्शन घेतल्याचा अहवाल प्रशासकांना सादर करून यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे पापुलवार यांनी सांगितले. अनधिकृत नळ घेणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.