औरंगाबाद : शहरातील वाहतूकव्यवस्था अधिक चांगली व्हावी, यासाठी महापालिकेकडे अनेक जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. या जबाबदाऱ्यांतून मनपा प्रशासन हात झटकत आहे. शहरातील अनेक चौकांमधील सिग्नलवर बसविण्यात आलेले टायमर घड्याळच गायब झाले आहेत. कोणत्या सिग्नलवर किती थांबावे लागेल, हे वाहनधारकांना कळायला मार्गच नाही.महापालिकेने पाच वर्षांपूर्वी तब्बल सव्वाकोटी रुपये खर्च करून २७ सिग्नल अत्याधुनिक केले होते. पूर्वी सिग्नल लांब अंतरावरून दिसत नव्हते. त्यासाठी मनपाने उंच पोल उभारून सिग्नल लावले. प्रत्येक चौकात टायमर घड्याळ बसविण्यात आले होते. ही चांगली सुविधा औरंगाबादकरांना काही वर्षेच अनुभवता आली. मागील काही वर्षांपासून अनेक सिग्नलवरील टायमर गायब झाले आहेत. अत्यंत मोजक्याच चौकात हे टायमर घड्याळ दिसतात; पण त्यात किती वेळ थांबायचे ते आकडेच दिसत नाहीत. ११ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करून मनपाने शहरातील सर्व वाहतूक दिवे चांगले केले होते. पूर्वी शहरातील सिग्नलची जी अवस्था होती, तीच अवस्था सध्या होऊन बसली आहे. अनेक ठिकाणी तर आता सिग्नलच दिसत नाहीत. रात्री ९ वाजेनंतर फक्त पिवळा दिवा सुरू असायला हवा, अनेक ठिकाणी लाल दिवा बंद-चालू असतो. त्यामुळे नवीन वाहनधारक बुचकळ्यात पडतात. अचानक ब्रेक मारल्याने जालना रोडवर रात्री अपघातही झाले आहेत. मोंढा नाका, आकाशवाणी आणि अमरप्रीत चौकात रात्री १० ते १२ वाजेपर्यंत अनेक वाहनधारक वेगात जाण्याच्या प्रयत्नात सिग्नलवरील विचित्र दिवा पाहून अचानक थांबतात. विशेष बाब म्हणजे रात्री ९ वाजेनंतर शहरात जड वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे.
सिग्नल टायमर गायब
By admin | Published: November 25, 2014 12:43 AM