कन्नड : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कन्नड बायपासवर नगर परिषदेने शहराचा दिशादर्शक फलक लावला होता. फलकाअभावी प्रवाशाची दिशाभूल तसेच वारंवार अपघात होत असल्याने न.प.ने पुढाकार घेत वेलकम कन्नड असा एक डिजिटल फलक बुधवारी लागला होता; परंतु राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याची तातडीने दखल घेत विनापरवाना फलक लावला म्हणून तो काढून येत नगरपरिषदेच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली. यात श्रेयवादाच्या लढाईमुळे राजकारण झाल्याने तो विनापरवाना असल्याच्या मुद्यावर एकच दिवसात काढावा लागला असल्याचे पुढे आले.
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम झाले. यामुळे अपघात कमी होतील, अशी अपेक्षा होती; मात्र कामे झाले आणि नवीन अपघातस्थळे या महामार्गावर तयार झाल्याचे गेल्या काही घटनांच्या माध्यमातून पुढे आले आहे. त्यात सर्वात धोकादायक स्थळ बनले ते औरंगाबादकडून कन्नडकडे बायपासला ओलांडून जातानाचे ठिकाण. या ठिकाणी आतापर्यंत बारा अपघात झाले असून, काही निष्पापांचा जीव गेला. काहींना गंभीर दुखापत झाली तर काहींचे वाहनांच्या नुकसानावर निभावले; मात्र प्राधिकरणकडून उपाययोजना झाल्या नाही. याची दखल घेत कन्नड नगर परिषदेने बुधवारी (दि.१९) सायंकाळी नागरिकांचे स्वागत करणारा एक डिजिटल दिशादर्शक फलक लावला होता; मात्र प्राधिकरणाने तो विनापरवाना लावला म्हणून गुरुवारी काढून घेत न.प. विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. संबंधित दिशादर्शक फलक हा प्रवाशांसाठी आवश्यक होता; पण प्राधिकरणाच्या आडून या फलकाबाबत राजकीय खेळी खेळल्या गेली, अशी चर्चा कन्नडमध्ये रंगत आहे.
---- प्राधिकरणाने वेळ मारून नेली ------
संघर्ष समितीने या महामार्गावरील अपघातस्थळांची यादीच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देत उपाययोजना सुचविल्या होत्या. त्यासाठी पाठपुरावाही पण केला. मात्र प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी फक्त वेळ मारून नेली. उपाययोजनांमधील एक मुद्दा हा या महामार्गावरील दिशादर्शक फलकांचा होता; मात्र त्याच्याकडेही दुर्लक्ष झाले. औरंगाबादहून कन्नडकडे जाताना बायपासहून वळताना कन्नडचा दिशादर्शक फलक नसल्याने बऱ्याच वाहनधारकांची फसगत होते. अनेक गावांबाबत हा प्रकार आहे. त्यामुळे काही चालक द्विधा मनस्थितीत अपघाताला निमंत्रण देतात. हे टाळण्यासाठी बऱ्याच लोकप्रतिनिधी, संघर्ष समिती यांनी सांगूनसुद्धा दिशादर्शक फलक आजपर्यंत लावल्या गेला नव्हता.
---- फलकावरील फोटोमुळे अडचण ---
कन्नडमधील तो दिशादर्शक फलक विनापरवाना असल्यामुळे काढावा लागला, हे सत्य आहे; पण याबाबत पडद्यामागिल राजकारण वेगळेच आहे. या फलकाबाबत शक्यता अडचणी आल्या नसत्या; परंतु त्यावर नगराध्यक्ष स्वाती कोल्हे आणि त्यांचे पती सभागृह नेते संतोष कोल्हे यांचे फोटो असल्यामुळे श्रेय वादाच्या लढाईमुळेच तो काढावा लागला असल्याची चर्चा रंगत आहे. आगामी काळात कन्नड नगर परिषदेेची निवडणूक असल्याने शहरात कुरघोडीचे राजकारण तापत आहे.