औरंगाबाद : शेती क्षेत्राला आलेली मरगळ दूर करण्यासाठी औषधी वनस्पतीची जोड दिल्यास विक्री व्यवस्थेचे शिवधनुष्य पेलण्याचे काम ‘कृषीदूत’च्या माध्यमातून आम्ही करू, असा विश्वास राकेश चौधरी यांनी व्यक्त केला.
कृषीदूत विश्व विकास फाऊंडेशनची पहिली राज्यस्तरीय परिचय बैठक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात शुक्रवारी झाली. या बैठकीत शेतमालाला हमीभाव मिळत नाही. त्यामुळे व्यापारी गब्बर होत असून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यासाठी शेतात औषधी वनस्पतीची लागवड केली, तर तिला हमीभाव देण्याची जबाबदारी ‘कृषीदूत’ घेईल. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन अडीच ते तीन पटीने वाढेेल. शेतीत राबणाऱ्या लोकांची रुची वाढेल, असा विचार आपल्या शेतात औषधी वनस्पती सफलतापूर्वक उगविणाऱ्या राकेश भुते (ब्रह्मी), संतोष दरेकर, डॉ. धनंजय नेवाडकर, चंद्रकांत सावरा आदी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या वक्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
‘कृषीदूत’चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कोंडिराम धुमाळ, विनायक हर्बलचे राकेश चौधरी, प्रवक्ते पुष्कराज सिंह, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अरविंद धाबे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. या राज्यस्तरीय बैठकीला राजस्थानसह भंडारा, नागपूर, पालघर, पुणे तसेच मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांतील वनस्पती शेतीचे जाणकार उपस्थित होते. बैठकीच्या यशस्वीतेसाठी पांडुरंग नायक, सूरज वैद्य, उमाशंकर, अभिलाख सिंह, भूषण सिरसाठ आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण घोडे यांनी केले.