छत्रपती संभाजीनगर : विजयादशमीनंतर नाशिक-अहमदनगर जिल्ह्यातील धरणसमूहांतून जायकवाडीसाठी ११ ते १३ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय होणे शक्य आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळात प्राथमिक बैठक झाली.
बैठकीला मुख्य अभियंता विजय घोगरे, सबीनवार, नाशिक, अहमदनगर पाटबंधारे विभागाचे अभियंते उपस्थित होते. यंदा मराठवाड्यात १५ टक्के पावसाची तूट आहे. या विभागाची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणात सध्या ४७.०६ टक्के जलसाठा आहे. मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी या जिल्ह्यांसाठी संजीवनी असलेल्या जायकवाडी धरणात १५ ऑक्टोबरपर्यंत ४७.२३ टक्के जलसाठा होता. गतवर्षीच्या उपयुक्त पाणीसाठ्यापेक्षा तो ५३ टक्के कमी आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील शेतीसिंचनावर परिणाम होईल, शिवाय पिण्याच्या पाण्याची टंचाई होणे शक्य आहे.
समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार......२००५ मध्ये शासनाने समन्यायी पाणीवाटप कायदा मंजूर केला. त्यानुसार मेंढीगिरी समितीच्या काही शिफारशी स्वीकारल्या. त्यात जायकवाडीत दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी सुमारे ४९.८४ टी.एम.सी. म्हणजेच ६५ टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा प्रथमत: करण्यात यावा. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील गोदावरी व नगर जिल्ह्यातील मुळा प्रवरा धरणांतून जायकवाडी धरणामध्ये ६५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होण्यासाठी कमी पडणारे पाणी सोडावे, असे ठरले होते. त्यानुसार जायकवाडीत दरवर्षीच्या १५ ऑक्टोबर रोजी उपयुक्त पाणीसाठा विचारात घेऊन पुढील रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सोडले जाते.
पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हेयंदा कमी पाऊस पडल्याने नाशिक-नगरमधील धरणांतून मराठवाड्यासाठी पाणी सोडावे, अशी मागणी आता जोर धरत आहे. परभणीतील किसान सभेने वरच्या धरणातून २० टीएमसी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी महामंडळ प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले. तर नगर जिल्ह्यातील काही शेतकरी आंदोलनासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. एकूणच पाणी सोडण्यावरून नाशिक-अहमदनगर विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष पेटण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.
दृष्टिक्षेपात जायकवाडीची सद्यस्थिती....एकूण क्षमता : १०२ टीएमसीउपयुक्त पाणीसाठा : ७६ टीएमसी१६ ऑक्टोबरचा पाणीसाठा.......उपयुक्त ३६ टीएमसी म्हणजे ४७.०५ टक्केसमन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार ६५ टक्के उपयुक्त साठा धरणात पाहिजे.त्यानुसार कमी पडणारा उपयुक्त पाणीसाठा १३.७६ टीएमसीधरणातील आजपर्यंत झालेला एकूण पाणी वापर : ७ टीएमसीधरणात आलेले पाणी : २४ टीएमसीअहमदनगर व नाशिकमधून लागणारे अंदाजे पाणी : ११ ते १३ टीएमसी