बीड : ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी हाक देत रविवारी ऐतिहासिक क्रांतीमोर्चाच्या नियोजन बैठकीत अन्याय, अत्याचाराविरुद्ध एल्गार करण्याचा एकमुखी निर्णय झाला. मूकमोर्चासाठी ३० आॅगस्ट ही तारीख निश्चित झाली आहे. विद्यार्थिनी, महिला अग्रभागी राहणार असून कोणाच्याही नेतृत्वाशिवाय मोठ्या जनसमुदायासह हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे, हे विशेष!कोपर्डी (ता. कर्जत) येथील घटनेचा निषेध करण्यासाठी औरंगाबादच्या धर्तीवर येथे मोर्चा निघणार आहे. त्यानुषंगाने बार्शी रोडवरील आशीर्वाद लॉन्समध्ये पूर्वतयारीसाठी रविवारी बैठक झाली. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने बैठकीस प्रारंभ झाला. संपूर्ण सभागृह गर्दीने खचाखच भरले होते. यावेळी कोणीही मंचावर बसले नव्हते. बडेजावपणालाही फाटा देण्यात आला होता. हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत नियोजनावर शिक्कामोर्तब झाले. वाहतूक तळासह पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेचेही नियोजन केले. विविध समित्याही नेमण्यात आल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात होणार असून प्रमुख मार्गावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. प्रातिनिधिक स्वरूपात पाच विद्यार्थिनी व पाच महिला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील.यावेळी माजी मंत्री शिवाजीराव पंडित, आ. अॅड. लक्ष्मण पवार, माजी आ. राजेंद्र जगताप, अनिल जगताप, अशोक हिंगे, राजेंद्र मस्के, अर्जून जाहेर पाटील, जि.प. अध्यक्ष विजयसिंह पंडित, जि.प. सदस्य युद्धजित पंडित, स्वप्नील गलधर, जयदत्त धस, कुंडलिक खांडे, प्रा. शिवाजी खांडे, अशोक रोमण, अशोक सुखवसे, राहुल वाईकर, संतोष जाधव, मनोज जाधव, विनोद चव्हाण, अशोक ठाकरे, किशोर पिंगळे, प्रभाकर कोलंगडे, कुंदा काळे, अॅड. हेमा पिंपळे, कमल निंबाळकर, अनिता शिंदे, रत्नमाला धांडे, अंजली गोरे, सविता बंड, जि.प. सदस्या जयश्री मस्के, नगरसेविका प्रियंका पाटील, सुनीता हिंगे, रेखा गोरे, सुजाता सपकाळ, अंजली मेटे, वैशाली मेटे आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
मूक मोर्चातून एल्गार !
By admin | Published: August 22, 2016 12:48 AM