सिल्लोड आगाराने बंद केलेली सिल्लोड-धुळे बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. घाटनांद्रामार्गे सुरू केलेली सिल्लोड- धुळे ही बससेवा सिल्लोड आगाराने पंधरा दिवसांतच बंद केल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. घाटनांद्रा गाव हे सिल्लोड तालुक्यातील सर्वात मोठे व जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे. तसेच हे गाव कन्नड, सोयगाव, सिल्लोड या तीन तालुक्यांना जोडणाऱ्या सीमेवर येत असल्याने या तालुक्यातील विविध गावांना जाण्यासाठी येथील बसस्थानकात नेहमीच प्रवाशांची मोठी वर्दळ असते. सकाळी ८:३० वाजेची सिल्लोड ते पाचोरा बस निघून गेल्यावर त्यानंतर एकही बस या रस्त्यावर नसल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागते किंवा जास्तीचे पैसे देऊन दुसऱ्या मार्गाने प्रवास करावा लागतो. घाटनांद्रा हे गाव तीन तालुक्यांच्या सीमेवर असल्याने येथून धुळे- पारोळा व धुळ्याहून पुढे सुरत, नाशिक, गुजरात, राजस्थान, मुंबई आदी ठिकाणी जाण्यासाठी एकही लांब पल्ल्याची बस नसल्याने आगाराने बंद केलेली सिल्लोड-धुळे ही बससेवा पूर्ववत करण्याची मागणी नीलेश बिसेन, शिवनाथ चौधरी, गणेश निकम, रंगणाथ मोरे, आकाश मोरे, राजू गायकवाड, शांतलिंग कोठाळे आदी प्रवाशांनी केली आहे.
चौकट
लग्नसराईमुळे गर्दी वाढली
सध्या लग्नसराईचे दिवस असून खाानदेश भागात जाण्यासाठी बसची संख्या कमी आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी होत असून अनेकजण उभ्याने दाटीवाटीने प्रवास करीत आहेत.
छायाचित्र : घाटनांद्रामार्गे सिल्लोड-धुळे बससेवा बंद केल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. छाया : दत्ता जोशी,-