सिल्लोड : तालुक्यातील भवन, घाटनांद्रा, आमठाणा, अंधारी, बोरगाव बाजार, डोंगरगाव, केऱ्हाळा व सिल्लोड शहरात अवैध बोगस ऑनलाइन लॉटरीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. शासन मान्यता नसलेल्या लॉटरीमुळे ग्राहकांची फसवणूक होत आहे. गोरगरीब जनता, या बोगस लॉटरीच्या आमिषाला बळी पडत असल्याने अनेकांचे संसार यामुळे उघडे पडत आहेत.
गेल्या दोन वर्षांपूर्वी शासनाची राजश्री नावाने ऑनलाइन लॉटरी चालत होती. आता जीएसटी लागल्याने व भाव कमी मिळत असल्याने ही लॉटरी बंद पडली आहे. यात काही भामट्यांनी विविध ऑनलाइन सॉफ्टवेअर तयार करून अवैध ऑनलाइन लॉटरी व्यवसाय सुरू केला आहे. जिल्ह्यात एक हजार सॉफ्टवेअर बोगस नावाने तयार करण्यात आले आहे. त्यात बोगस जीएसटी नंबर टाकून या लॉटऱ्या सुरू आहेत.
चौकट
जास्त खेळलेला आकडा काढला जात नाही
ऑनलाइन लॉटरीत कोणता आकडा जास्त खेळला गेला. हे या बुकींना सर्व दिसत असल्याने ते तो आकडा कधीच काढत नाहीत. यातही आपली लबाडी उघड होऊ नये म्हणून ग्राहकांसाठी थोडेफार आकडे काढले जातात. या सर्व प्रक्रियेत बुकींना ८० टक्के पैसे उरत असल्याचे समाेर आले असून, केवळ २० टक्के पैसे वाटप केले जातात.
चौकट
ठिकठिकाणी अड्डे
सिल्लोड शहरात, ग्रामीण भागात तालुक्यातील भवन, घाटनांद्रा, आमठाणा, अंधारी, बोरगाव बाजार, डोंगरगाव, केऱ्हाला येथे ठिकठिकाणी लॉटरी सुरू आहे. शासनमान्य लॉटरी असे बोर्ड लावून हा गोरखधंदा जोरात सुरू आहे. याची सर्व सूत्रे ही मुंबईहून हलविली जातात. आता तर ग्रामीण भागात अनेक बुकींनी स्वतःचे सॉफ्टवेअर तयार करून लोकांची लूट सुरू केली आहे.
कोट
लॉटरीचा गोरख धंदा बंद करणार
सिल्लोड तालुक्यात ठिकठिकाणी बोगस लॉटरीचा गोरख धंदा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. सोमवारी दुपारी भवन येथील एका बोगस लॉटरी केंद्रावर छापा मारून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तालुक्यातील इतर ठिकाणी सुरू असलेला हा गोरख धंदा छापे मारून बंद करण्यात येईल.
- पूजा गायकवाड, परिवीक्षाधीन पोलीस उपअधीक्षक, औरंगाबाद.