दिवसेंदिवस वाढतेय चिंता : ४२२ जणांना बाधा, १०६ जणांवर सुरू आहेत उपचार, नऊजणांचा गेला बळी
श्यामकुमार पुरे
लोकमत न्यूज नेटवर्क
सिल्लोड : तालुक्यात गेल्या दोन महिन्यात २,२६५ रुग्ण सापडले आहेत तर ५८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाचे ५९४ रुग्ण सक्रिय आहेत. ग्रामीण भागात सर्वात जास्त रुग्ण चिंचपूर गावात आढळले असून, येथील एकूण बाधितांची संख्या ७०वर पोहोचली आहे. मात्र, आता तेथील स्थिती सुधारली असून, ९० टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याचवेळी सिल्लोड शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येने चिंता निर्माण झाली आहे. सिल्लोड शहरात आतापर्यंत ४२२ रुग्ण सापडले असून, त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला तर ३१२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. शहरातील १०६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
शहराची लोकसंख्या ८० हजारांच्या जवळपास आहे. संशयितांची कोरोना चाचणी करण्यासाठी शहरातील शाहू मंगल कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. काही नागरिक कोरोनाला मानत नसले तरी सिल्लोड नगर परिषद, पोलीस प्रशासन, महसूल व आरोग्य विभागाने रस्त्यावर फिरणाऱ्या काही नागरिकांना पकडून त्यांचे स्वॅब घेतले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, शहरातील गर्दी भीतीपोटी कमी झाली आहे. मास्क न लावता फिरणाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे. मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे नियम शहरात सुमारे ८० टक्के तरी लोक पाळत असल्याचे दिसून येते. सिल्लोड शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे हे रस्त्यावर उतरल्याने शहरात लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. गल्लीबोळात मात्र काही लोक ‘हम नही सुधरेंगे’ या अविर्भावात राहून नियमांचे उल्लंघन करत आहेत.
३८ घरे केली सील
नगर परिषद प्रशासनाकडून शहरात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. बाधित रुग्णांच्या संपर्कातील संशयितांचे स्वॅब घेण्याचे काम सुरू आहे. संशयितांना गृह अलगीकरणात राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. शहरातील ३८ घरांना कोरोनाबाधित असल्याने सील करण्यात आले आहे. तसेच निर्जंतुकीकरणही केले जात आहे.
पहिल्या लाटेनंतरची गर्दी रुग्णवाढीला कारणीभूत
सिल्लोड शहरात सध्या तरी विवाह समारंभ, अंत्ययात्रा, उत्तरकार्यात म्हणावी तशी गर्दी दिसत नाही. तरीही शहर व तालुकाभरातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्यास या कार्यांसाठी झालेली गर्दीच कारणीभूत ठरली आहे. पहिल्या लाटेनंतर नो मास्क, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता. बिनधास्त गर्दी जमवून होणारे सार्वजनिक कार्यक्रमही यासाठी तितकेच कारणीभूत ठरले आहेत.
---
सिल्लोड बातमीसाठी दोन फोटो आहेत.