लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : येथील उपजिल्हा रुग्णालयातील ‘ट्रामा केअर युनिट’ शोभेची वास्तू बनली आहे. गेल्या ४ वर्षांपासून इमारत तयार असली तरी ती बांधकाम विभागाने अजून आरोग्य विभागाच्या ताब्यात दिलेली नाही. सिल्लोड शहरातील ट्रामा केअरला सुरू होण्यास ग्रहण लागल्याने अनेक अपघातग्रस्त रुग्णांना प्राणाला मुकावे लागत आहे.एकीकडे आरोग्य विभाग बांधकाम विभाग इमारत ताब्यात देत नाही असे म्हणत आहे तर दुसरीकडे बांधकाम विभागाने इमारत ताब्यात देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. दोन्ही विभाग ‘ट्रामा’चा चेंडू एकमेकांकडे टोलवताना दिसत आहे. यात त्रास होतोय तो रुग्णांना.सिल्लोड शहरातील उपजिल्हा रुग्णालय समस्यांचे माहेरघर बनले आहे. ट्रामाचे उद्घाटन होऊन दोन वर्षे उलटले तरी नागरिकांच्या सेवेत ते उपलब्ध नाही. ज्या ठेकेदाराने ट्रामाचे काम केले त्यालाच पुन्हा येथील शिशुगृहाचे काम देण्यात आले आहे. या कामाची तक्रार झाल्याने ते काम सुद्धा बंद पडले आहे. ज्या नागरिकाने खोटी तक्रार करून शिशुगृहांचे काम बंद पाडले त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली आरोग्य विभागाने सुरू केल्या आहेत. तालुक्याची व्याप्ती मोठी असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या रुग्णांना प्राथमिक उपचार करून औरंगाबाद येथे हलविण्यात येते किंवा खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावा लागतो.‘ट्रामा’ सुरू न झाल्यास उपोषणट्रामा केअर सेंटर सुरू करावे, रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी, नसता प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी उपोषण करण्यात येईल, असा इशारा एमआयएमचे जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख्तार यांनी उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्याकडे दिलेल्या निवेदनात दिला आहे. या निवेदनावर एमआयएमचे जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख्तार, युवा तालुकाध्यक्ष अन्वर पठाण, युवक शहराध्यक्ष फहीम पठान, विधानसभाध्यक्ष शेख रफीक, शमीम रझवी, अशोक सोनवणे यांच्या सह्या आहेत.चार वर्षांपूर्वी ही इमारत बांधली गेली. हिचे काही काम अपूर्ण आहे. ट्रामा युनिट सुरू करण्यासाठी ही इमारत ताब्यात द्यावी, यासाठी आरोग्य विभागाने सिल्लोड येथील बांधकाम विभागाला तब्बल १४ पत्र दिले आहे. मात्र अजून इमारत ताब्यात मिळाली नाही. तज्ज्ञ नसल्याने सोनोग्राफीही बंद आहे.-डॉ. एम. एस. सरदेसाई, अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, सिल्लोडजी कामे इस्टिमेंटमध्ये नाही, ती कामे आम्ही कशी करणार, आम्ही तर आरोग्य विभागाला आहे त्या स्थितीत इमारत ताब्यात देण्यास तयार आहोत, तेच घेत नाही. काही कामे अपूर्ण असतील तर ती कामे किंवा दुरुस्ती नंतरही करता येईल.- पी. जी .खडेकर, उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग सिल्लोड
सिल्लोडच्या ‘ट्रामा केअर’ला ग्रहण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:20 AM