लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : न. प. निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी नगरसेवकपदासाठी २२०, तर नगराध्यक्षपदासाठी २६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.ही निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असून अंतिम टप्प्यात भाजप -शिवसेनेची युती झाली. एमआयएम व भारिप बहुजन महासंघ एकत्र लढणार आहे. राष्ट्रवादी, बीएसआरपी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आप, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटना, सिल्लोड शहर परिवर्तन आघाडी करुन मैदानात उतरली आहे.उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सकाळी १० वाजेपासूनच उपविभागीय अधिकारी कार्यालयात उमेदवारांनी गर्दी केली होती. १३ जागेवर २६ नगरसेवकांसाठी सोमवारी केवळ ६४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र शेवटच्या दिवशी १८० उमेदवार नामनिर्देशनपत्र घेऊन आल्याने गर्दी झाली होती. ३ वाजता अखेरची वेळ असल्याने प्रांगणात आलेल्या उमेदवारांना टोकन देण्यात आले. मंगळवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले.उमेदवारी अर्ज दाखल करण्यास उशीर झाल्याने रात्री उशिरापर्यंत यादी तयार करण्याचे काम सुरु होते. बुधवारी सकाळी सर्व उमेदवारांची यादी बोर्डवर लावण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी निवृत्ती गायकवाड, सहायक निवडणूक अधिकारी रामेश्वर गोरे यांनी दिली.२६ नगरसेवकांसाठी २२० तर नगराध्यक्षासाठी २६ असे २४६ विक्रमी उमेदवारी अर्ज दाखल झाले.अखेरच्या क्षणी युतीया निवडणुकीत अखेरच्या क्षणी भाजप व शिवसेनेची युती झाली. भाजप १९ तर शिवसेना ७ जागा लढवणार आहे. काँग्रेस स्थबळावर लढणार आहे. त्यांनी सर्व जागेवर उमेदवार उभे केले आहेत. एमआयएम व भारिप बहुजन महासंघाने एकूण २३ जागेवर उमेदवार उभे केले आहे. सिल्लोड शहर परिवर्तन आघाडीच्या राष्ट्रवादी, बीएसआरपी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आप आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड, स्वाभिमानी शेतकरी संघटना, प्रहार संघटनेने आघाडी करुन २६ उमेदवार मैदानात उभे केले आहेत. यामुळे निवडणुकीत रंगत वाढली आहे.मंगळवारी दाखल २४६ अर्जांची बुधवारी छाननी होणार आहे. अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख १८ फेब्रुवारी आहे. १९ पासून प्रचार सुरु होईल. उमेदवारी दाखल करण्यासाठी काँग्रेसचे विद्यमान नगराध्यक्ष अब्दुल समीर, नंदकिशोर सहारे, भाजपचे सुरेश बनकर, इद्रीस मुलतानी, सुनील मिरकर, ज्ञानेश्वर मोठे, एमआयएमचे तालुकाध्यक्ष बनेखाँ पठाण, जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख्तार, राष्ट्रवादीतर्फे तालुकाध्यक्ष अजित पाटील, शहराध्यक्ष शेख शाकेर, कम्युनिस्ट पक्षातर्फे कॉ. सय्यद अनीस, शेख अमान, आम आदमीचे शेख उस्मान, महेश शंकरपेल्ली, बहुजन समाज पक्षातर्फे जगदीश बेदवे, संतोष गायकवाड, संभाजी ब्रिगेडचे काकासाहेब मोरे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.४इच्छुकांची उमेदवारी नाकारल्यास तो बंडखोरी करील, यासाठी भाजप, काँग्रेस, एमआयएमने अखेरपर्यंत उमेदवार घोषित केले नाही. यामुळे पक्षाचे बी फॉर्म लावण्यास व उमेदवारी दाखल करण्यास सर्वच पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व पक्ष प्रमुखांना ऐनवेळी धावपळ करावी लागली. यात अनेक दिग्गज व विद्यमान नगरसेवकांना डच्चू देण्यात आल्याने किरकोळ वाद झाले. काहींनी नाराजी व्यक्त केली तर काहींनी बघून घेईल, असा धमकी वजा इशारा पक्ष प्रमुखांना दिला.
सिल्लोड न.प. निवडणूक; २४६ उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:52 AM