लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : शेतकऱ्यास केलेली शिवीगाळ, हिंदू देवतांची विटंबना केल्याप्रकरणी आ. अब्दुल सत्तार यांना अटक करा, या प्रमुख मागणीसाठी सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी शनिवारी मिरवणूक काढून सिल्लोड शहर बंदचे आवाहन केले होते.यात भाजप, शिवसेना, हिंदू जनजागरण समितीही सहभागी होती. त्यामुळे शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलिसांनी ४० आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची सुटका केली. शहरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता, पण पोलिसांनी हस्तक्षेप करुन वातावरण शांत केले.सकाळी आंदोलनकर्ते व काही दुकानदारात शाब्दिक बाचाबाची झाली, पण पोलिसांनी हस्तक्षेप करून जमाव पांगविला. शुक्रवारी रात्री काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी दुकाने सुरु ठेवा, अशा सूचना व्यापाऱ्यांना दिल्याने शनिवारी गोंधळ उडाला होता. सकाळपासूनच सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र येऊन बंदचे आवाहन करताना शहरात दिसत होते.शनिवारी सकाळी ९ वाजता जवळपास ९० टक्के बाजारपेठ बंद झाली होती. काही ठिकाणी दुकाने सुरु असल्याने जमावातील काही लोकांनी या दुकानांवर दगडफेक केली, पण पोलिसांनी हस्तक्षेप करून जमाव पांगविला व शांतता ठेवण्याचे आवाहन केले.आंदोलनकर्त्यांनी आ. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करुन त्यांच्या अटकेची मागणी केली. यावेळी माजी आ. सांडू पाटील लोखंडे, सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोठे, इद्रीस मुलतानी, अशोक गरुड, श्रीरंग साळवे, दिलीप दाणेकर, ज्ञानेश्वर तायडे, राजेंद्र जैस्वाल, कमलेश कटारिया, विनोद मंडलेचा, सुनील मिरकर, रघुनाथ चव्हाण, किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल, मनोज मोरेल्लू, विष्णू काटकर, विलास पाटील, दादाराव वानखेडे, शेख शफीक, विनोद पगारे, चंदू साळवे आदींसह हजारो कार्यकर्ते, आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले होते.
सिल्लोड कडकडीत बंद
By admin | Published: June 18, 2017 12:49 AM