एक वर्ष उलटले तरी देखील कोरोना महामारी थांबायचे नाव घेत नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील देशी, विदेशी मद्य विक्री करणारे बार व वाईन शॉप्स बंद आहेत. त्यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे. हतनूर परिसरात पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने कुणालाच न जुमानता हे महाभाग बिनधास्त दारूविक्री करीत आहेत. लॉकडाऊनमध्ये चढ्या भावाने दारूची विक्री होत असून देखील कुठेही कारवाई होताना दिसत नाही. देशी दारूची बाटली ६० रुपयांवरून १५० रुपयांवर पोहोचली आहे, तर विदेशी दारूही ३५० रुपयांपासून पुढे विकली जात आहे. तालुक्यातून धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाला लागून अनेक हॉटेल्स आहेत. तेथे केवळ पार्सल सुविधा देण्याचे आदेश असूनही अनेक ठिकाणी चोरीछुप्या मार्गाने हॉटेल्स सुरू राहतात, तर काही ठिकाणी दारूची व्यवस्थाही होत असल्याने तळीरामांची रेलचेल वाढलेली दिसत आहे. यावर दारूबंदी पथक व पोलीस प्रशासनाचा कुठलाही वचक दिसत नाही.
लॉकडाऊनमध्ये अवैध दारू विक्रेत्यांची चांदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:02 AM