छत्रपती संभाजीनगर : मोबाईलचा डेटा अचानक संपत असल्याचा अनुभव मोबाईलधारकांना येत आहे, तर अनेकजण साधा मोबाईल वापरतात. अशा मोबाईलधारकांना रिचार्ज मारताना काही ''''जीबी'''' डेटा मिळतो; परंतु मोबाईल साधा असल्याने तो वापरलाच जात नाही. मग हा डेटा कुठे जातो, मोबाईलच्या ''''डेटा''''त ''''काटा'''' मारला जात आहे का, असा सवाल मोबाईलधारकांकडून उपस्थित केला जातो आहे.
इंटरनेट, सोशल मीडिया आणि आता ‘एआय’ वापराच्या काळात मोबाईलधारकांना दिवसभरात दीड जीबी, दोन जीबी डेटा कसा संपतो, हे कळत नाही. कोणी सतत मोबाईलवर सक्रिय असतो, तर कोणी दिवसभरात काही वेळेसाठी मोबाईलचा वापर करतात. या सगळ्यांना मोबाईलचा डेटा संपत असल्याचा अनुभव येतो. ‘डेटा’ संपताच छोट्या किमतीचा ‘रिचार्ज’ मारण्याची वेळ ओढावत आहे. मोबाईलमधील इंटरनेट ‘स्पीड’, डाऊनलोडिंग , व्हिडीओची गुणवत्ता आदींवर ‘डेटा’ वापर ठरतो, असे एका कंपनीच्या कर्मचाऱ्याने सांगितले.
छोट्या रकमेचे ‘रिचार्ज’ विविध कंपन्यांकडून काही तासांसाठी, एका दिवसासाठी, दोन-तीन दिवसांची मुदत असलेले छोट्या रकमेचे डेटा ‘रिचार्ज’ची सुविधा दिली जात आहे. दिवसभरातील डेटा अचानक संपेल आणि हे छोटे रिचार्ज मारले जातील, यासाठीच ते आणले का, असा सवाल मोबाईलधारक उपस्थित करीत आहेत.
असे तुमच्यासोबत होते का? अचानक ‘डेटा’ संपल्याचा मेसेज? मोबाईलचा वापर करताना काही वेळ होत नाही, तोच आधी ‘तुमचा दिवसभरातील ५० टक्के डेटा वापरून झाला आहे...’ असा मेसेज येतो. त्यानंतर मोबाईलधारक नेटचा वापर कमी करतो. त्यानंतर डेटा संपल्याचा मेसेज येतो. त्यामुळे अनेकांना नाईलाजाने काही तासांसाठीचा ‘रिचार्ज’ मारावा लागत असल्याचे मोबाईलधारकांनी सांगितले.
साधा मोबाईल, मग डेटा कुठे जातो? केवळ बोलण्यासाठी साध्या मोबाईलचा वापर होतो. मात्र, जेव्हा ‘रिचार्ज’ टाकला जातो, तेव्हा काही ‘जीबी’ डेटाही मिळत असतो. साधा मोबाईल असल्याने हा डेेटा वापरलाच जात नाही. मग डेटा कुठे जातो, असा सवाल मोबाईलधारकांनी उपस्थित केला.
मोबाईलवर ‘४जी’ची रेंज, पण नेट ठप्पमोबाईलवर ‘४जी’ची रेंज असते; परंतु अचानक इंटरनेटच ठप्प पडते. ‘डेटा’ असतो, ‘रेंज’ असते. मात्र, तरीही इंटरनेट काम करत नाही, असे वारंवार होते. आवश्यकतेच्या वेळेत डेटा वापरताच येत नाही, असेही काही मोबाईलधारकांनी सांगितले.
पारदर्शकतेची अपेक्षा नाहीनफ्याच्या उद्देशाने कंपन्या काम करतात. त्यांच्याकडून पारदर्शकतेची अपेक्षा करू नये. सरकारी कंपनीत ग्राहकांना अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते. खासगी कंपन्यांत तक्रार करणे अवघड होते.- रंजन दाणी, महाराष्ट्र सचिव, नॅशनल फेडरेशन ऑफ टेलिकॉम एम्प्लॉइज, बीएसएनएल
रेंज फुल, तरीही अचानक नेट चालत नाहीमोबाईलमध्ये २ ‘जीबी’चा डेटा असूनही अनेकदा अचानक काही वेळेसाठी इंटरनेट चालत नाही. ‘४जी’ची रेंजही फुल दाखवित असते. तरीही नेट चालत नाही. व्हिडीओ पाहणे सोडा, एखादा विषय सर्चदेखील होत नाही. हे वारंवार होते. दिवसभरातील डेटा वापरताच येत नाही.- सय्यद नजीब, मोबाईलधारक.