व्यंकटेश वैष्णव , बीडजिल्ह्यात टंचाई परिस्थिती असल्याने ९०० टँकरद्वारे जिल्ह्याला पाणीपुरवठा होत आहे. या स्थितीचा फायदा घेऊन दहा टन पाण्याचे टँकर चौदा टन दाखवून बिले उचलली जात असल्याचा प्रकार जिल्ह्यात घडत आहे. याशिवाय जी.पी.एस.च्या प्रिंट न काढताच बिले उचलण्यासाठी काही ठेकेदारांची धावपळ सुरू आहे. जिल्ह्यातील टंचाई परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. आजघडीला साडेअकराशे गावांमध्ये ९०० टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. अशा परिस्थितीचा फायदा जिल्ह्यातील काही ठेकेदार घेत आहेत. याबाबत बीड येथील सामाजिक कार्यकर्ते प्रेमचंद लोढा यांनी गत आठवड्यात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे तक्रार केली आहे.जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव, वडवणी, परळी या तालुक्यांमध्ये ठेकेदार उद्भवावर पाणी न भरता जवळच्याच एखाद्या खाजगी शेतकऱ्याच्या बोअरवरून पाणी भरत आहेत व दूरचे अंतर कागदोपत्री दाखवले जात आहे, याबाबत प्रशासनातील अधिकाऱ्यांना माहिती असतानादेखील याकडे डोळेझाक केली जात असल्याने महिनाकाठी कोट्यवधी रुपयांचा गंडा ठेकेदार शासनाला घालत आहेत.
टँकरच्या मापामध्ये पाप
By admin | Published: April 24, 2016 11:48 PM