लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खाम नदी किनाऱ्यावरून शहरात प्रवेश करण्यासाठी ४०० वर्षांपूर्वी बांधलेले महेमूद गेट, मकाई गेट आणि बारापुल्ला गेटच्या दोन्ही बाजूने पूल बांधून वाहतूक कोंडी दूर करावी, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून आहे. त्यातील बारापुल्ला गेट येथे भूसंपादन किंवा इतर त्रासदायक बाबी नाहीत. त्यामुळे तेथील काम सुरू करण्यास हरकत नसल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच वर्षांपूर्वी तिन्ही पुलांचे काम करण्याची तयारी दर्शविली होती. यादृष्टीने अंदाजपत्रक तयार करून शासनाकडे पाठविण्यात आले. राज्य शासनाने तिन्ही पुलांसाठी १२ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला. मात्र, हा निधी औरंगाबादपर्यंत कधीच पोहोचला नाही. छावणी, भावसिंगपुरा, संगीता कॉलनी, नंदनवन कॉलनी, विद्यापीठ, बेगमपुरा, मकबरा, हनुमान टेकडी आदी भागांकडे जाण्यासाठी नागरिकांना पाणचक्की येथील महेमूद दरवाजा, घाटी रुग्णालयाच्या उत्तरेकडील मकाई गेट आणि मिलकॉर्नर येथील बारापुुल्ला गेटचा वापर करावा लागतो. दररोज सकाळी आणि संध्याकाळी या दरवाजांमध्ये वाहतुकीची कोंडी होते. मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादकर हा त्रास सहन करीत आहेत. ४०० वर्षांपूर्वी हे पूल बांधलेले आहेत. या पुलांचे आयुष्य केव्हाच संपल्याचा अहवालही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे.
तीन नव्हे एक पूल उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:18 AM