औरंगाबाद : स्नेहनगर येथे पक्षीमित्र रमेश राऊत व छगनसिंग राजपूत यांनी टाकाऊ वस्तूंपासून चिमण्यांना पाण्याचा कृत्रिम हौद आणि अन्नासाठी लोखंडी स्टँड तयार केले आहे. तंत्र संघटनेचे सचिव गणेश पवार व क्रांती चौक ठाण्याचे फौजदार गजानन सोनटक्के यांच्या हस्ते धान्य व पाणी टाकून जागतिक चिमणी दिन साजरा केला. या वेळी ॲड. संतोष मेने, सिडको पोलीस ठाण्याचे फौजदार रतन डोईफोडे, वन विभागाचे गोविंद वैद्य, उल्हास नाईक, सुभाष काकडे, अमित नाईक, गौरव सोनटक्के, मंजुश्री डोईफोडे, रिद्धी राजपूत, संगीता राऊत आदींची उपस्थिती होती.
लॉकडाऊनमध्येही लोकांची रात्री रस्त्यावर गर्दी
औरंगाबाद : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाने शहरात रात्रीचा अंशत: लॉकडाऊन केला आहे. परंतु, नागरिकांकडून स्थानिक प्रशासनाच्या या निर्णयाला केराची टोपली दाखवली आहे. बिनधास्तपणे नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. नंदनवन कॉलनीतील माऊली चौकात भावसिंगपुऱ्याकडे जाणाऱ्या २० ते २५ वाहनधारकांना पोलिसांनी अडवून ठेवले होते.
‘व्हायरॉलॉजी’ अभ्यासक्रमाची नोंदणी सुरु
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सन २०२१-२२ या शैक्षणिक सत्रापासून ‘व्हायरॉलॉजी’ हा एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु केला जाणार असून १ एप्रिलपासून या अभ्यासक्रमाची ऑनलाईन नोंदणी सुरु झाली आहे. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून प्रशिक्षित तज्ज्ञ मनुष्यबळ निर्मिती केली जाणार आहे.
शांतीपुऱ्यात चुकीच्या ठिकाणी गतिरोधक
औरंगाबाद : लिटिल फ्लाॅवर स्कूल ते नंदनवन कॉलनीपर्यंत सिमेंटचा रस्ता असून मागील चार- पाच दिवसांपूर्वी या रस्त्यावर शांतीपुरा येथे चुकीच्या ठिकाणी डांबराचे गतिरोधक करण्यात आले आहे. एक तर हे गतिरोधक लिटिल फ्लाॅवर शाळेमागे वळणावर अथवा बिल्डर्स सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठिकाणी उभारले, असते तर वाहनांचा वेग कमी होऊन संभाव्य अपघात रोखता येऊ शकला असता, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.
कमी दाबाने नळाला पाणी
औरंगाबाद : अलीकडे नंदनवन कॉलनी, संगिता कॉलनी, न्यू नंदनवन कॉलनी, भुजबळनगर, पद्मपाणी सोसायटी, बिल्डर्स सोसायटी, वसुंधरा कॉलनी आदी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. नागरिकांना ६ दिवसआड व तोही कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाविरुद्ध संतापाचे वातावरण पसरले आहे.