औरंगाबाद : सर, परदेशात कागदी लायसन्स पाहून हसतात, अशी खंत व्यक्त करीत गुरुवारी एका वाहनचालकाने आरटीओ अधिकाऱ्यांकडे आंतरराष्ट्रीय वाहन परवाना (आयडीपी) ‘स्मार्ट’ करण्याची मागणी केली.
आरटीओ कार्यालयात गुरुवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रमेशचंद्र खराडे यांच्या कक्षात एका वाहनचालकाने प्रवेश केला. यावेळी सदर वाहनचालकाने रमेशचंद्र खराडे यांच्याकडे कागदपत्रे सादर केली. ही कागदपत्रे तपासत असताना या वाहनचालकाने जो मुद्दा मांडला, तो ऐकून आजूबाजूचे सर्वजण स्तब्ध झाले. आरटीओ कार्यालयाकडून आंतरराष्ट्रीय वाहन परवाना दिला जातो. हा वाहन परवाना अनेकदा केवळ एका एम-४ आकारात दिला जातो, तर कधी पुस्तक (पासपोर्ट आकाराप्रमाणे) स्वरूपात दिले जाते; परंतु परदेशात कागदी लायसन्स पाहून हसतात. त्यामुळे स्मार्ट कार्ड स्वरूपात हे लायसन्स मिळण्याची गरज असल्याचे या वाहनधारकाने म्हटले.
नोकरी, शिक्षणानिमित्त परदेशात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परदेशात जाणाऱ्या नागरिकांना वाहन चालविण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडून आंतरराष्ट्रीय परवाना दिला जातो. त्यासाठी आरटीओ कार्यालयात अर्ज करावा लागतो. काही महिन्यांपूर्वी आरटीओ कार्यालयात ए-४ आकाराच्या कागदावर हा परवाना दिला जात होता. आता हा परवाना पुस्तक स्वरूपात दिला जात आहे. आरटीओ कार्यालयाकडून पक्का परवाना आणि आरसी स्मार्ट कार्ड स्वरूपात दिले जाते; परंतु आंतरराष्ट्रीय परवाना अद्यापही कागदी स्वरूपात दिला जात आहे.
वरिष्ठ पातळीवरील विषयआंतरराष्ट्रीय वाहन परवाना देण्याची पद्धत ठरलेली आहे. त्यानुसार हा परवाना दिला जातो. सध्या पुस्तक स्वरूपात हा परवाना वाहनचालकांना दिला जात आहे. स्मार्ट कार्ड स्वरूपात परवाना मिळणे, हा वरिष्ठ पातळीवरील विषय आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी सतीश सदामते म्हणाले.