औरंगाबाद : संचारबंदी असताना बाहेर पडण्यासाठी कोण कोणते कारण सांगेल याची कल्पना पोलिसांनाही येऊ शकत नाही. विनाकारण बाहेर पडलेल्या एकाने चक्क पकडलेले उंदीर सोडण्यासाठी घराबाहेर पडल्याचे अजब कारण क्रांती चौक पोलिसांना सांगितले. त्याचे हे कारण पोलिसांना न पटल्याने त्याला ५०० रुपये दंड करण्यात आला.
क्रांती चौक ठाण्याचे फौजदार गायकवाड, हवालदार योगेश नाईक आणि कर्मचारी औरंगपुऱ्यात तैनात होते. यावेळी त्यांनी एका दुचाकीस्वाराला अडवले. संचारबंदीचे नियम मोडून कुठे फिरत आहात, असे पोलिसांनी त्याला विचारले. तेव्हा त्याने उंदीर सोडण्यासाठी गेलो होतो, असे अजब कारण पोलिसांना सांगितले. त्याचे हे उत्तर ऐकून पोलीस अचंबित झाले. घरात खूप उंदीर झाल्यामुळे उंदीर पकडण्यासाठी पिंजरा लावला होता. यात दोन उंदीर अडकले होते. हे उंदीर सोडण्यासाठी गेलो होतो, असे तो म्हणाला. त्याचे उत्तर ऐकून पोलिसांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली.
वाढत्या कोरोना संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी संपूर्ण राज्यात काल रात्रीपासून १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे. या संचारबंदीत फिरणारे बहुतेक नागरिक दवाखान्यात जात आहे, किराणा सामान आणण्यासाठी निघालो, तर काही जण गळ्यात ओळखपत्र अडकून अत्यावश्यक सेवेत कार्यरत असल्याची बतावणी पोलिसांना करताना दिसले. संचारबंदीचा आज पहिला दिवस. संचारबंदी मोडून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर थेट कारवाई करण्याचे निर्देश शासनाने दिले. यामुळे सकाळपासून पोलीस आयुक्तांसह दोन उपायुक्त आणि सर्व ठाणेदार फौजफाट्यासह विविध रस्त्यांवर उतरले होते. आकाशवाणी चौकात पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे आणि अन्य कर्मचाऱ्यांनी रखरखत्या उन्हात नागरिकांवर कारवाई केली.
उपायुक्त खाटमोडे, एसीपी वानखेडे कारवाईत सहभागी
दिवसभरात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, सहायक आयुक्त सुरेश वानखेडे, पोलीस निरीक्षक जी. एच. दराडे क्रांती चौकात होते. हर्सूल टी पॉइंट येथे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी कारवाई केली.
चौकट
पिळदार मिशांमुळे मास्क नाही
आजच्या कारवाईदरम्यान एक जण त्याच्या पिळदार मिशा इतरांना दिसाव्यात म्हणून तो विनामास्क दुचाकी चालवत असल्याचे पोलिसांनी पाहिले. पोलिसांनी त्यांना थांबवून दंडात्मक कारवाई केली. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना दम्याचा त्रास आहे. श्वास गुदमरत असल्याने मास्क काढल्याचे दुचाकीस्वाराचे म्हणणे होते.
कोट...
दोनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक; रिक्षाचालकांवर कारवाई
दोनपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करण्यास रिक्षाचालकांना मनाई आहे. या नियमाला पायदळी तुडवत प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षावर यावेळी पोलिसांनी कारवाई केली.