साहेब, चपरासीसुद्धा फिरकला नाही; अतिवृष्टीग्रस्त शेतकरी ढसाढसा रडले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 11:37 AM2022-10-27T11:37:45+5:302022-10-27T11:38:27+5:30
आता तोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे शेवटच्या टप्प्यात परतीच्या अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा जवळपास शंभर टक्के खर्च करून झालेला होता
औरंगाबाद - जिल्ह्यातील करमाड तालुक्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांचा अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त क्षेत्रात पीक पाहणी दौरा सुरू आहे. यात बुधवारी फेरन जळगाव व ढवळापुरी या भागात पाहणी सुरू असता ढवळापुरी येथील शेतकरी अक्षरशः ढसाढसा रडले. सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी, महसूल विभाग किंवा कृषी विभागाचे कोणीही साधे पंचनामा करायला देखील आले नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे.
आता तोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे शेवटच्या टप्प्यात परतीच्या अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा जवळपास शंभर टक्के खर्च करून झालेला होता. पुढील पंधरा दिवसात सोयाबीन, मूग , उडीद अशा पिकांची सोंगणीची वेळ आली होती. कपाशीच्या देखील अनेक ठिकाणी कैऱ्या सडल्या असून ज्या ठिकाणी कापूस लागलेला आहे तो कापूस देखील पूर्ण भिजून गेलेला आहे. डाळिंबासारख्या फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. त्यामुळे शासनाने हेक्टरी 50 हजार ची मदत करावी अशी मागणी डॉ.कल्याण काळे यांनी केलेली आहे.
औरंगाबाद - अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान, शासनाकडून पंचनामे होत नसल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांच्यासमोर शेतकरी अक्षरशः रडले pic.twitter.com/bV8XF9qkjV
— Lokmat (@lokmat) October 27, 2022
औरंगाबाद जिल्ह्याला पहिल्यांदा कृषी मंत्री पद तर अनेक वर्षानंतर स्थानिक पालकमंत्र्यांकडे सहकार मंत्री पद मिळाल्याने आपण त्यांच्याकडे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणार असून ते देखील ही परिस्थिती समजून मदत करतील अशी अपेक्षा काळे यांनी व्यक्त केली. मात्र शासनाने जर झोपेचे सोंग घेतले तर वेळप्रसंगी आंदोलन करून शेतकऱ्यांना मदत देईपर्यंत मंत्र्यांना बाहेर फिरू देणार नाही. असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला