औरंगाबाद - जिल्ह्यातील करमाड तालुक्यात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ.कल्याण काळे यांचा अतिवृष्टीने झालेल्या नुकसानग्रस्त क्षेत्रात पीक पाहणी दौरा सुरू आहे. यात बुधवारी फेरन जळगाव व ढवळापुरी या भागात पाहणी सुरू असता ढवळापुरी येथील शेतकरी अक्षरशः ढसाढसा रडले. सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी, महसूल विभाग किंवा कृषी विभागाचे कोणीही साधे पंचनामा करायला देखील आले नसल्याने शेतकरी हवालदिल झालेले आहे.
आता तोंडाशी आलेल्या खरीप पिकांचे शेवटच्या टप्प्यात परतीच्या अतिवृष्टीने नुकसान झाल्याने शेतकऱ्यांचा जवळपास शंभर टक्के खर्च करून झालेला होता. पुढील पंधरा दिवसात सोयाबीन, मूग , उडीद अशा पिकांची सोंगणीची वेळ आली होती. कपाशीच्या देखील अनेक ठिकाणी कैऱ्या सडल्या असून ज्या ठिकाणी कापूस लागलेला आहे तो कापूस देखील पूर्ण भिजून गेलेला आहे. डाळिंबासारख्या फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. त्यामुळे शासनाने हेक्टरी 50 हजार ची मदत करावी अशी मागणी डॉ.कल्याण काळे यांनी केलेली आहे.