छत्रपती संभाजीनगर : ‘मेरी राखी की डोर कभी हो ना कमजोर, भैया दे दो कलाई, बहेन आयी है...’ अशाच काहीशा ओळी रक्षाबंधनाच्या दिवशी प्रत्येक बहीण म्हणते. राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीच्या सुरक्षेचे वचन देतो. मात्र, एक बहीण अपघातामुळे रुग्णालयातील खाटेवर खिळलेल्या लाडक्या भावाच्या आरोग्याची ‘डोर’ अधिक घट्ट करण्यासाठी धडपडत आहे. त्यासाठी ती एक दिवसही घरी गेली नाही, हे विशेष.
आकांक्षा व तिचा मोठा भाऊ रितेश पुसे (रा. जांभाळा, ता. गंगापूर) अशी या भावंडांची नावे आहेत. कामावरून परतत असताना रितेशचा अपघात झाला. यात त्याच्या दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर सध्या घाटी रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागात उपचार सुरू आहेत. या विभागात कोण बहीण-भाऊ आहेत, असे विचारताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांबरोबर इतर रुग्ण, नातेवाइकांनी आकांक्षा आणि रितेश यांच्याकडे बोट दाखविले. इतके ते दोघे सर्वांना परिचित बनले आहेत. १७ जुलै रोजी अपघात झाला, तेव्हापासून आकांक्षा ही रुग्णालयातच आहे. जोपर्यंत भाऊ बरा होत नाही, तोपर्यंत घरी जाणार नाही. आता जाईल तर भावाला घरी घेऊनच जाईल, असे अकरावीत शिकणारी आकांक्षा म्हणाली. अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डाॅ. एम. बी. लिंगायत आणि त्यांच्या पथकातील डाॅक्टर, इन्चार्ज सिस्टर एलिझाबेथ राजपूत, परिचारिका वंदना गिरे, गीता पाबळे आदी उपचार करत आहेत.
सर्वात मोठा सण यंदा रुग्णालयातआमच्यात रक्षाबंधन हा सण सर्वात मोठा सण असतो. यावर्षी तो रुग्णालयात साजरा करावा लागतो आहे, असे आकांक्षा म्हणाली. दरवर्षी बहिणीला कपडे घेत असतो. पण यावर्षी रुग्णालयात आहे आणि ती काळजी घेत आहे, हे सांगताना रितेशच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. दरम्यान, आज हे वृत्त प्रसिद्ध होताच शहरातील समाजसेवकांनी घाटी रुग्णालयात जाऊन या बहिण-भावासह रक्षाबंधन साजरा केला.