- संतोष हिरेमठऔरंगाबाद : उद्या रक्षाबंधन आहे...हे वाक्य ऐकताच तिला अश्रू अनावर झाले. दरवर्षी भावाला राखी बांधणारा हात अपघातात मोडला, कंबरेचीही शस्त्रक्रिया करावी लागली. गेल्या दीड महिन्यांपासून उपचार सुरू आहेत; पण पहिल्या दिवसापासून भाऊ दिवस-रात्र रुग्णालयात आहे, जमेल तशी काळजी घेत आहे. खऱ्या अर्थाने ‘तो’ बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडत आहे. भावाविषयी बोलताना बहिणीला आपल्या भावना आवरणेही कठीण झाले होते. दुखापतीने हात उचलणेही कठीण होत आहे. तरीही राखी बांधू...असा विश्वासही तिने व्यक्त केला. हा प्रसंग पाहून वाॅर्डातील प्रत्येक जण क्षणभर भावुक झाला.
बीड येथील रहिवासी सोनाली किरण साबळे यांच्यावर घाटी रुग्णालयातील अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागाच्या वाॅर्डात ७ जुलैपासून उपचार सुरू आहेत. वाहन अपघातात त्यांच्या कंबरेला जोरदार मार लागला, माकडहाड सरकले आणि हात मोडला. या सगळ्यावर त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. दुखापती आणि वेदनांतून त्या सावरत आहेत. त्यासाठी पती किरण साबळे यांची साथ आहे. सोबत लहान भाऊ सागर डोंगरदिवे हादेखील उभा आहे. दीड महिन्यापासून सागर हा घाटीत आपल्या बहिणीची काळजी घेत आहे. रुग्णालयात दाखल करण्यापासून तिच्यासाठी औषधी, जेवण, पाणी आणण्यासाठी धावपळ करीत आहे. ‘लोकमत’शी बोलताना सागर म्हणाला, दरवर्षी बहिणीकडे जाऊन राखी बांधून घेत होतो; पण यावेळी ती रुग्णालयात आहे. ती लवकर बरी व्हावी, तिच्यासाठी माझ्या परीने सर्व काही करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तो म्हणाला. अस्थिव्यंगोपचारशास्त्र विभागप्रमुख डाॅ. एम. बी. लिंगायत आणि त्यांच्या पथकातील डाॅक्टर, परिचारिका रुग्णाच्या उपचारासाठी प्रयत्न करीत आहेत.
कोणाला भावाची, कोणाला बहिणीची आठवणऐन रक्षाबंधनाच्या दिवशी उपचारासाठी रुग्णालयात दाखल राहण्याची वेळ अनेकांवर ओढवली आहे. या दोन भावा-बहिणींना पाहताना वाॅर्डातील इतरांनाही भावाची, बहिणीची आठवण आली.