औरंगाबाद : ११ आणि १२ मे रोजी झालेल्या दंगलीप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत नोंदविण्यात आलेल्या सात गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.
आयुक्त म्हणाले की, दंगलीची एक आक्षेपार्ह व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली. या क्लीपची चौकशी केली जात आहे. पोलिसांशी हस्तांदोलन केल्यानंतर दंगेखोर सामान्यांची वाहने जाळपोळ करीत असल्याचे यात दिसत आहे. ९ मिनिटांच्या या व्हिडिओ क्लीपची पडताळणी करून कोणी चूक केली असेल तर त्यांना माफ केले जाणार नाही. दंगलीसंबंधी अनेक व्हिडिओ क्लीप आणि छायाचित्रे प्राप्त होत आहेत. व्हिडिओ क्लीप आणि छायाचित्रे पाहून दंगेखोरांची ओळख पटविण्यात येत आहे. संशयितांची धरपकड सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे ३३ जणांना अटक करण्यात आली असून, ६० ते ७० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दंगलीला लच्छू पहिलवान कारणीभूत असल्याचा आरोप एमआयएमने, तर शिवसेनेने एमआयएमवर आरोप केला. या दंगलीत त्यांची काय भूमिका आहे, या प्रश्नाचे उत्तर देताना पोलीस आयुक्त म्हणाले की, या दंगलीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या प्रत्येकाविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. मोतीकारंजा, शहागंज, नवाबपुरा, राजाबाजार आणि गांधीनगर, चेलीपुरा आदी भागांतील दंगलीत झालेल्या नुकसानीचे पोलिसांनी पंचनामे केले; परंतु हे नुकसानीचे पंचनामे महसूल विभागाकडून के ले जाणार आहेत. यामुळे दंगलीत नेमके किती आणि कोणाचे नुकसान झाले, हे आज ठामपणे सांगता येणार नाही.
एसआयटीकडून तपास सुरू- उपायुक्त डॉ. घाडगेदंगलीविषयी सिटीचौक, क्रांतीचौक आणि जिन्सी पोलीस ठाण्यात एकूण ७ गुन्हे नोंद झाले आहेत. या गुन्ह्यांचा आणि दंगलीचा तपास एसआयटीने सुरू केल्याची माहिती एसआयटी प्रमुख पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी दिली. या एसआयटीमध्ये सहायक पोलीस आयुक्त, तीन पोलीस निरीक्षक, १५ पोलीस उपनिरीक्षकांसह २५ जणांचा समावेश आहे.